Fadnavis' criticism of Congress बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अल्प यशावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप–प्रतिआरोपांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर तीव्र टीका केली. बिहारमध्ये काँग्रेस फक्त सहा जागांवर आल्यावर राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर उघडपणे प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, पराभवानंतर आत्मपरीक्षण टाळणारे नेते शेवटी धुळीतच मिसळतात.
फडणवीस म्हणाले, लोकशाहीत जिंकणारा राजा असतो. ज्यांचा पराभव झाला, त्यांनी आपली चूक मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. आत्मपरीक्षण करण्याऐवजी विरोधकांना दोष देणे चुकीचे आहे. त्यांनी स्पष्ट केले की पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यावर विचार करणे आवश्यक आहे, अन्यथा राजकीय अस्तित्व टिकवणे कठीण होते.
बिहारच्या निकालानंतर राहुल गांधींनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये निवडणूक ‘निष्पक्ष नव्हती’ असा आरोप करत महाआघाडीला मत दिलेल्या मतदारांचे आभार मानले होते. तसेच हा निकाल धक्कादायक असल्याचे सांगत लोकशाही व संविधान रक्षणाची लढाई पुढेही सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेसने स्वतंत्रपणे लढवण्याच्या चर्चेवरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.विरोधक एकत्र लढतात की स्वतंत्र याला फार अर्थ नाही. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास महाआघाडीवर आहे. लोकांनी पुढील प्रतिनिधी कोण असावा हे स्पष्टपणे ठरवले आहे,” असे ते म्हणाले.