मुझफ्फरपूर,
Fire in Muzaffarpur मुझफ्फरपूरमधील मोतीपूर येथील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये शुक्रवारी रात्री एका घरात भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर चार जण भाजून गंभीर जखमी झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आग लागल्याची वेळ रात्री उशिरा होती आणि घरातील सर्व सदस्य झोपलेले होते, त्यामुळे ते स्वतःला वाचवू शकले नाहीत.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी आरडाओरडा करून मदत मागितली. घटनास्थळी गर्दी जमली आणि काही नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता इतकी होती की ती नियंत्रित करणे कठीण झाले. पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
जळालेल्या चार जखमींना तत्काळ एसकेएमसीएच रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये लालन साह, त्यांची आई, पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पश्चिमेकडील पोलीस उपायुक्त सुचित्रा कुमारी यांनी सांगितले की, मोतीपूर येथील या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी आहेत. पोलिस या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत.