आर्क्टिकमध्ये सापडले २४० दशलक्ष वर्षांपूर्वीचे ३०,००० जीवाश्म!

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
आर्क्टिक,
Fossils found in the Arctic आर्क्टिकमधील स्पिट्सबर्गेन बेटावर सापडलेल्या एका विलक्षण जीवाश्मसंपन्न ठिकाणामुळे पृथ्वीवरील प्राचीन सागरी जीवनाचा नवा अध्याय उजेडात आला आहे. सुमारे २४९ दशलक्ष वर्षे जुन्या या जीवाश्मांमध्ये सुरुवातीच्या सागरी सरपटणाऱ्या प्राण्यांचे दात, हाडे आणि इतर अवशेष असे एकूण ३०,००० पेक्षा अधिक नमुने सापडले आहेत. दशकभर चाललेल्या संशोधनानंतर मिळालेला हा खजिना डायनासोरपूर्व काळातील सर्वात प्राचीन आणि संपन्न सागरी परिसंस्थांपैकी एक मानला जात आहे.
 
 
Fossils found in the Arctic
 
ओस्लो विद्यापीठ आणि स्वीडिश म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री यांच्या संयुक्त संशोधनातून उघड झाले की पर्मियन काळातील प्रचंड जीवसृष्टी नष्ट होण्याच्या घटनेनंतर अवघ्या तीन दशलक्ष वर्षांत सागरी जीवनाची जलद पुनरुत्पत्ती झाली. पूर्वी असा समज होता की या मोठ्या विनाशानंतर जैवविविधतेस पुनर्स्थापित होण्यासाठी अत्यंत दीर्घ काळ लागला. मात्र स्पिट्सबर्गेनमधील पुराव्यांनी ही धारणा पूर्णपणे बदलून टाकली आहे.
 
शास्त्रज्ञांनी ८०० किलोपेक्षा अधिक जीवाश्म काळजीपूर्वक उकरून काढले. लहान शार्कांच्या दातांपासून ते प्रचंड आकाराचे इचथियोसॉरच्या हाडांपर्यंत सर्व प्रकारचे अवशेष या उत्खननात सापडले. ग्रिड-आधारित पद्धतीने केलेल्या या उत्खननातून त्या काळातील समुद्रांत आधीच एक गुंतागुंतीचे अन्नजाळे आणि संतुलित पर्यावरण अस्तित्वात असल्याचे दिसून आले. लहान शिकार करणारे ग्रिपिया लॉन्गिरोस्ट्रिससारखे प्राणी, पाच मीटरपेक्षा जास्त लांबीचे भयंकर भक्षक तसेच अफानेरम्मासारखे जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी वावरणारे जीव अशा विविध प्रजाती एकाच परिसंस्थेत नांदत असल्याचे पुरावे मिळाले.
 
या शोधातून स्पष्ट होतं की पर्मियन सामूहिक विनाशानंतर सागरी जीवसृष्टीने अपेक्षेपेक्षा कितीतरी वेगाने उभारी घेतली. जगभरातील तुलनात्मक अभ्यासातही स्पिट्सबर्गेनचा जीवाश्मतळ हा आरंभीच्या डायनासोर युगातील सर्वाधिक संपन्न कशेरुकी अवशेषांचा ठेवा मानला गेला आहे. त्यामुळे सागरी जीवन लाखो वर्षांत हळूहळू विकसित झाले ही पारंपरिक धारणा ढासळली असून, उलटपक्षी हे प्राचीन प्राणी विनाशकारी घटनांमधून बाहेर पडताच नवीन अधिवासांचा वेगाने ताबा घेत उत्क्रांत झाले, असे आता स्पष्ट झाले आहे.