गोंडवाना विद्यापीठ सेवाकर्मी गुणांकनात राज्यात अव्वल

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
गडचिरोली,
gondwana university उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयामार्फत सार्वजनिक विद्यापीठांच्या आस्थापनांसाठी राबविण्यात येणार्‍या सेवाकर्मी उपक्रमाच्या नुकत्याच झालेल्या गुणांकनात गोंडवाना विद्यापीठाने राज्यातील सर्व विद्यापीठांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रशासनिक पारदर्शकता, कर्मचारी सेवा-सुविधांचे प्रभावी व्यवस्थापन आणि सेवा-पुरवठ्यातील वेग यांसारख्या सर्व निर्देशकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाने हा मान मिळवला आहे.
 
 

gondwana 
 
 
या गुणांकनात संस्थेच्या आकृतीबंधापासून ते सर्व संवर्गांच्या अद्ययावत जेष्ठता सूची, पदोन्नती व सरळसेवा नियुक्तीस्थिती, रिक्त पदांची माहिती, बिंदूनामावली, अनुकंपा नियुक्ती, आयजीओटी पोर्टलवरील नोंदणी व कोर्स पूर्णता, सेवापुस्तकांचे अद्ययावतीकरण व डिजिटायझेशन यांचा समावेश होता. प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारी, नागरिक-केंद्रित कार्यपद्धती आणि सेवा ऑनलाइन करण्याच्या प्रक्रियेचेही परीक्षण करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाने सर्व घटकांत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत राज्यात पहिला क्रमांक आपल्या नावावर केला. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी या यशाची प्रशंसा करत सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. ते म्हणाले, हे यश प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्राध्यापक वृंद यांच्या एकत्रित परिश्रमांचे फलित आहे.gondwana university विद्यार्थी व कर्मचार्‍यांना दर्जेदार सेवा देण्याची बांधिलकी आम्ही पुढेही अधिक दृढ करू, असे ते म्हणाले. गोंडवाना विद्यापीठाच्या या कामगिरीमुळे गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांत उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून विद्यापीठात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गोंडवाना विद्यापीठाची अलीकडील उल्लेखनीय कामगिरी
गोंडवाना विद्यापीठाने अल्पावधीत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक मानांकित यश मिळवले आहेत. यामध्ये रासेयो विभागाला राज्यशासनाचा बहुमान तसेच राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार, वेळेवर परीक्षांचे निकाल जाहीर केल्याबद्दल राज्यपालांकडून प्रशस्तीपत्र, विद्यापीठाच्या ग्रामसभा सक्षमीकरण एकल प्रकल्पाला भारत सरकारचा एफआयसीसीआय पुरस्कार, भारत सरकारच्या ई-समर्थ प्रणालीचे मोड्युल्स सक्षमपणे अंमलबजावणी करणार्‍या विद्यापीठांमध्ये गोंडवाना विद्यापीठ राज्यात दुसर्‍या क्रमांकावर. या सर्व यशामुळे गोंडवाना विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण, कार्यक्षम प्रशासन आणि सेवा-उत्कृष्टतेच्या दिशेने आपली ओळख मजबूत केली आहे.