वर्धा,
construction-workers : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहे. अशाच एका योजनेंतर्गत कामगारांना किचन सेट आणि सुरक्षा संच नि:शुल्क वाटप करण्यात येते. यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करणे गरजेचे असते. मात्र, मोफत साहित्य वाटप होत असल्याने अनेकांनी बोगस कागदपत्र व दाखले जोडून एजन्ट मार्फत बोगस नोंदणी करीत योजनेचा लाभ उचलत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची सत्यता पडताळण्यासाठी कामगार आयुत नागपूर कार्यालयाने पथके तयार करून विशेष मोहीम राबविली. यात तळेगाव टालाटुले येथील नुरजहा आशिद करीम शेख (४७), शेख आशिद शेख करीम (४६) आणि एजन्ट दीपक तिमांडे हे दोषी आढळल्याने त्यांच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जिल्हा, तालुका सुविधा केंद्रामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यानंतर तालुका सुविधा केंद्रातील कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्या छाननीनंतर अर्ज मंजूर करण्यात येतात. सदर सेवा मंडळामार्फत नि:शुल्क राबविण्यात येतात. मंडळामार्फत देण्यात येणारे सर्व लाभ कोणतेही शुल्क न आकारता येण्यात येत असले तरी बांधकाम कामगारांकडून पैशाची मागणी होत असल्याबाबत तसेच बोगस कागदपत्रं आणि दाखले करण्यात येत असल्याचे वृत्त समाज माध्यमांमधून पुढे आले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि अपर कामगार आयुत नागपूर यांच्या पत्रान्वये दक्षता पथक गठीत करण्यात आली. या पथकाद्बारे विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. मोहिमेंतर्गत बोगस कागदपत्र तयार करून होणारी नोंदणी, पैशांची मागणी याबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी मोहीम राबवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी यांनी १० सप्टेंबर रोजी कामगार आयुत नागपूर यांच्याकडे अहवाल सादर केला. या चौकशी अहवालात शेख आशिद शेख करीम व नुरजहा आशिद करीम शेख रा. तळेगाव (टा.) यांची दीपक तिमांडे रा. तळेगाव या एजन्टने नोंदणी करून दिल्याचे समोर आले. त्यानुसार नुरजहा आणि शेख आशिद यांनी यमुना लॉन, आर्वी नाका येथील साहित्य वाटप कार्यक्रमातून किचन सेट आणि सुरक्षा संचाची उचल केली होती. मात्र, या दोघांची चौकशी केली असता नुरजहा आशिद करीम शेख यांच्या नावाने कामड दुकान असून सुक्ष्म लघु एवंममध्ये उद्योग मंत्रालय, उद्यम वर्धा यांचा परवाना आहे. तर शेख आशिद शेख करीम यांचे चिकन सेंटर असून त्यांचा परवाना फुड अॅण्ड ड्रग्स अंतर्गत काढलेला असून त्यांच्या कामांचे स्वरुप बघता ते दोघेही बांधकाम कामगार नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, एजन्ट दीपक तिमांडे यांनी दोघांचेही बोगस कागदपत्रे व दाखले जोडून योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे मंडळ व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.