अबब... द्राक्षांतील संयुगामुळे मानवी आयुष्य १५० वर्षांपर्यंत वाढणार!

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
बीजिंग,
Grapes increase human lifespan चीनमधील शास्त्रज्ञांनी मानवी आयुष्य वाढवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतल्याचा दावा केला असून, द्राक्षांपासून तयार होणाऱ्या एका विशेष संयुगामुळे माणूस 100 नव्हे तर तब्बल 150 वर्षांपर्यंत जगू शकतो, असा संशोधनातून संकेत मिळत आहेत. वयाची शंभरीही दुर्मिळ झालेल्या काळात इतकं दीर्घ आयुष्य शक्य आहे, असं सांगितल्यावर अनेकांना ते अविश्वसनीय वाटू शकतं; पण शास्त्रज्ञांचे प्रयोग मात्र आशादायक ठरत आहेत. हे संशोधन चीनच्या शेन्झेन येथील लोन्वी बायोसायन्सेस लॅबमध्ये सुरू आहे. संशोधक पीसीसी1 नावाच्या अँटी-एजिंग औषधावर काम करत आहेत.
 
 

Grapes increase human lifespan 
हे औषध प्रत्यक्षात प्रोसायनिडिन सी 1 नावाचं द्राक्षांच्या बियांमध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक पॉलीफेनॉलवर आधारित आहे. शरीरात वय वाढल्यावर निर्माण होणाऱ्या निष्क्रिय, जुना झालेल्या ‘जंक सेल्स’ना नष्ट करण्याची क्षमता या संयुगात असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. अशा पेशींमुळे शरीरात जळजळ, थकवा, अशक्तपणा आणि वृद्धत्वाची अनेक लक्षणं दिसतात.लॅबने केलेल्या प्राथमिक प्रयोगांमध्ये, पीसीसी1 ने केवळ निष्क्रिय पेशींवरच परिणाम करून त्यांना नष्ट केलं, तर निरोगी पेशी अबाधित राहिल्या. उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये हे औषध देण्यात आलेल्या प्राण्यांचं आयुष्य सरासरी ९ टक्क्यांनी वाढल्याचं दिसलं. विशेष म्हणजे, उपचारानंतरच्या कालावधीतील त्यांचं उर्वरित आयुष्य तब्बल 64 टक्क्यांनी जास्त असल्याचं संशोधकांनी नोंदवलं. हे निष्कर्ष 2021 मध्ये ‘नेचर मेटाबोलिझम’ या प्रतिष्ठित शोधनिबंधात प्रसिद्ध झाले होते.
 
आता या तंत्रज्ञानाचा मानवांसाठी गोळीच्या स्वरूपात विकास सुरू असून, कंपनीचे सीईओ यिप त्सझोउ यांचं म्हणणं आहे की, आरोग्यदायी जीवनशैलीसोबत हे औषध वापरल्यास 150 वर्षांचं आयुष्य स्वप्न राहणार नाही, तर येत्या काही वर्षांत वास्तवात उतरेल. परंतु, तज्ज्ञांचा एक मोठा वर्ग सावधगिरीचा इशारा देतो. या औषधाची मानवांवर अद्याप एकही चाचणी झालेली नाही. मानवी शरीरावर त्याचा परिणाम कसा होईल, कोणते दुष्परिणाम संभवतील, सुरक्षितता कितपत असेल. हे सर्व तपासण्यासाठी दीर्घकालीन आणि कठोर क्लिनिकल चाचण्या आवश्यक आहेत. शिवाय एफडीआय आणि डब्लूएचओसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची मान्यताही आवश्यक आहे. बक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंगमधील वैज्ञानिकांच्या मते, उंदरांतील यश मानवांमध्ये तसंच पुनरुत्पादित होईल याची खात्री देता येत नाही. वृद्धत्व हा हजारो जैविक प्रक्रियांशी जोडलेला गुंतागुंतीचा विषय आहे; फक्त जुना झालेल्या पेशी नष्ट केल्याने सर्व समस्या सुटतील, असं सरळसोपं चित्र नाही. त्यामुळे 150 वर्षांच्या आयुष्याचा दावा आकर्षक असला तरी, त्यामागे भक्कम आणि व्यापक संशोधनाची गरज असल्याचं तज्ज्ञ स्पष्ट सांगतात.