हदगाव नप अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवाराचा श्रीगणेशा

अरुणा गिरींचे नामांकन दाखल

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
hadgaon-municipal-council : नगर परिषद निवडणुकीत पाचव्या दिवशी नामांकन प्रक्रियेला वेग आला असून दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणुकीची रंगत वाढवली. नप अध्यक्षपदासाठी अरुणा शिवशंकर गिरी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नामांकन दाखल केले आहे. प्रभाग सहामधून शिवाजी देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नगरसेवक पदासाठी अर्ज केला असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली.
 
 
y15Nov-Aruna-Giri
 
निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. मात्र सलग चार दिवस एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना ऊत आला होता. अखेर शुक्रवार, 15 नोव्हेंबर दोन अपक्ष उमेदवारांनी कार्यालयात जाऊन नामांकन दाखल करत निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरवात मिळवून दिली.
 
 
न. प. अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अरुणा गिरी यांचे नामांकन विशेष लक्षवेधी ठरले आहे. स्थानिक समस्यांविषयी त्यांची भूमिका, महिलांचा सहभाग वाढावा यासाठीचे त्यांचे प्रयत्न आणि स्वच्छ, पारदर्शक प्रशासनाची भूमिका यामुळे त्यांचे अर्ज दाखल होणे शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. शिवाजी देशमुख यांनी नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने प्रभाग सहा येथे निवडणुकीची चुरस वाढण्याची शक्यता आहे.
 
 
दरम्यान, नामांकन दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असून त्यापैकी एका दिवशी शासकीय सुट्टी असल्याने पुढील दोन दिवसांत राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या गर्दीचा उच्चांंक गाठला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणूक विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत एक अपक्ष नामांकन नप अध्यक्षपदासाठी आणि एक नामांकन नगरसेवक पदासाठी प्राप्त झाले.