पुणे,
Leopard sighting in Pune city मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरूर भागात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नरभक्षक बिबट्यांमुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. दिवसा घराबाहेर पडायला लोक घाबरू लागले आहेत. ग्रामीण भागात सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीनंतर आता पुणे शहरातही त्याच्या प्रवेशाची माहिती मिळाली आहे. मागील तीन दिवसात पुणे शहराच्या विविध भागात बिबट्याचा वावर आढळला आहे. शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात लोकांना दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिरूर परिसरात काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे घबराटीचं वातावरण असताना, शहरात शिरल्याने लोकांना त्वरीत त्याला जेरबंद करण्याची मागणी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवडाभरापासून फुरसुंगी, मांजरी, शेवाळवाडी आणि वडकी परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. फुरसुंगी जवळील सोनारपूल परिसरात नागरिकांनी बिबट्याचे दर्शन घेतल्याचे सांगितले. त्यानंतर दोन-तीन दिवसातच मांजरी–शेवाळवाडी परिसरातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळील भागात परवा रात्री आणि दुपारी दीडच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना बिबट्या दिसल्याचे काही नागरिकांनी नोंदवले. स्थानिक तरुणांनी बिबट्याचा फोटो काढून हडपसर पोलीस ठाण्याचे प्रमुख संजय मोगले आणि वनपाल शीतल खेंडके यांना तातडीने पाठवला. घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी आणि वनाधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. या वेळी बिबट्याचे पायाचे ठसे आढळले. पोलिस आणि वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.