मुख्य जलवाहिनी ट्रकच्या दबावाने फुटली

तिवसा शहराचा पाणीपुरवठा ठप्

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
तिवसा, 
main-water-pipe-bursts : तिवसा शहराला पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची मुख्य जलवाहिनी एका अवजड मालवाहू ट्रकच्या दबावाने पुन्हा एकदा तुटली असून संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ही गंभीर घटना प्रभाग क्रमांक ५ मधील असून राष्ट्रीय महामार्गालगतच्या रस्त्याला लागून असलेल्या ठिकाणी घडली. येथे रस्ता अत्यंत अरुंद असून त्या मार्गावरूनच महत्त्वाची पाणीपुरवठा लाईन व व्हॉल जात असल्यामुळे मोठ्या ट्रकांची वाहतूक धोकादायक ठरत आहे.
 

j 
 
 
१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान एक मालवाहू ट्रक अरुंद रस्त्यावरून जात असताना खाली पाइपलाईन असल्यामुळे त्यावर दबाव येऊन गंभीर तडा गेला आणि मुख्य जलवाहिनी पूर्णपणे तुटली. या परिसरात महाविद्यालय, मोठी वस्ती तसेच विद्यार्थ्यांची व नागरिकांची सततची ये-जा असल्याने वाहतुकीच्या या धोकादायक परिस्थितीवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. याच मार्गावर मोठ्या प्रमाणात कृषी सेवा केंद्रे असून अनेक सेवा केंद्रांचे गोदाम आहेत. येथून नेहमीच मोठ्या ट्रकांची वारंवार हालचाल सुरू असते आणि परिणामी जलवाहिनी तुटण्याच्या घटना घडत असतात.
 
 
काही दिवसांपूर्वी याच मुख्य जलवाहिनीची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती नगरपंचायत प्रशासनाने करून नव्याने जोडणी केली होती. परंतु वजनदार वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे पुन्हा एकदा पाइपलाईन तुटल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. फिल्टर प्लांटवरून शहरात जाणारा मुख्य पाणीपुरवठा याच लाइनवरून होत असल्याने आता पुन्हा नळ कोरडे पडण्याची वेळ आली आहे.
 
 
जलवाहिनी तुटण्याच्या घटनेनंतर नगरपंचायत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. मात्र ट्रकने केलेल्या नुकसानीचे प्रमाण मोठे असल्याने दुरुस्तीला मोठा कालावधी लागू शकतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नगरपंचायत प्रशासनाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. या गंभीर घटनेनंतरही नगरपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी संबंधित ट्रक चालकावर किंवा संबंधित कृषी सेवा केंद्र गोडाऊन मालकावर अद्याप कोणतीही कारवाई केल्याचे समजले नाही. वारंवार होणार्‍या घटनांवर प्रशासनाने ठळक कारवाई करावी असे नागरिकांचे मत आहे.