चंद्रपूर,
cci limit on cotton purchase राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकर्यांचे नुकसान वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सीसीआयने जाहीर केलेली कापूस खरेदीची मर्यादा चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी नुकसानदायक असून, ही मर्यादा मागच्या वर्षीप्रमाणे कायम ठेवावी, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी सीसीआयच्या संचालकांसोबतही दूरध्वनीवर चर्चा केली असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार म्हणतात, महाराष्ट्र कृषी विभागाने चालू हंगाम सन 2025-26 मध्ये कापसाची उत्पादकता ही प्रती हेक्टरी 12.80 क्विंटल ग्राह्य धरून पणन मंत्रालयामार्फत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार सीसीआयने चालु हंगामातील प्रती हेक्टरी 13.57 क्विंटल ग्राह्य धरून कापुस खरेदीची मर्यादा जाहीर केली. परंतु, प्रत्यक्षात चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हा प्रती हेक्टरी सरासरी 25 ते 40 क्विंटल कापसाचे उत्पन्न घेत असल्यामुळे शेतकर्यांपुढे सीसीआयमार्फत कापूस विक्रीकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे. सन 2024-25 या वर्षात या दोन्ही जिल्ह्यांसाठी सीसीआयने प्रती हेक्टरी 30 क्विंटल ही मर्यादा जाहीर केली होती.cci limit on cotton purchase त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीची प्रक्रियादेखील पूर्ण केली होती. चालू हंगामातील प्रती हेक्टरी क्विंटल मर्यादा फारच कमी असल्यामुळे शेतकर्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालू वर्षात देखील प्रती हेक्टरी 30 ते 40 क्विंटल ग्राह्य धरून कापूस खरेदीची मर्यादा जाहीर करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सीसीआयचे संचालक ललितकुमार गुप्ता यांच्याशीदेखील आ. मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. शेतकर्यांचे संभाव्य नुकसान त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.