तभा वृत्तसेवा
वणी,
ankush-bodhe : मनसेचे सक्रिय शहराध्यक्ष अंकुश चिंतामण बोढे यांनी शनिवार, 15 नोव्हेबर रोजी भाजपात प्रवेश घेतला. त्यांची लगेच जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या प्रभाग क्रमांक 11 मधून इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेत सर्वांना धक्का दिला.
अंकुश बोढे यांनी हे गेल्या काही काळापासून नप अध्यक्षपदासाठी तयारी करीत होते. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी जनसंपर्क सुरू केला होता. संपूर्ण वणीतील समस्यांकडे त्यांनी लक्ष देत पाठपुरावा केला. यातील अनेक समस्या त्यांनी सोडवल्या देखील. मात्र आरक्षण जाहीर झाल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्यानंतर त्यांचे नाव प्रभाग क्रमांक 11 साठी इच्छुक उमेदवारांमध्ये होते. याबाबत त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता.
अंकुश बोढे यांनी यवतमाळच्या भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा घेतला. माजी आमदार मदन येरावार व जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवी बेलूरकर, माजी नप अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा शहराध्यक्ष अॅड. नीलेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अंकुश बोढे यांच्या मनसेतील नाराजीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र शिवसेना उबाठा, मनसे एकत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे तर त्यांनी जय महाराष्ट्र केला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.