गाव-कॉलेजच्या वाटा रुग्णालयात, पालघरात दोन अपघातांनी धुमाकूळ!

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
पालघर,
Palghar double accident : पालघर जिल्ह्यात आज घडलेल्या दोन भीषण अपघातांनी परिसर हादरून गेला. पहिला अपघात पालघर डेपोची बस लाजव्हार–विक्रमगड मार्गावरील घाटातून उतरत असताना झाला. समोरून वेगाने येणाऱ्या फोर व्हीलरने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत अचानक बससमोर आल्याने हा अपघात घडला. प्रसंगावधान राखत बस चालकाने वाहन नियंत्रणात ठेवले आणि मोठी दुर्घटना टळली. बस दरीत कोसळण्याची शक्यता असतानाही चालकाने धीर न सोडता बस सुरक्षितपणे थांबवली. या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून मोठा अनर्थ टळला.
 

APGHAT 
 
 
 
या घटनेदरम्यान पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत सवरा हे या मार्गाने जात होते. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून प्रवाशांची विचारपूस केली आणि परिस्थितीची पाहणी केली.
 
दरम्यान, काही तासांतच जव्हारपासून दोन किलोमीटर अंतरावर चौथायची वाडी बस स्टॉपजवळ दुसरा मोठा अपघात झाला. जव्हार–ऐना मार्गावरील एसटी बस रस्त्याच्या बाजूला कोसळली. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमध्ये आयटीआयचे विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक–युवती आणि काही प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाल्याने नाशिकला हलवण्यात आले आहे, तर एका विद्यार्थीनीला डहाणू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या अपघाताबाबत चालक सुभाष गावित यांनी माहिती दिली की, “बस उतारावर असताना अचानक मोठा आवाज झाला. मी तात्काळ ब्रेक मारला, पण ब्रेकने काम केले नाही. त्यामुळे बस रस्त्याखाली कोसळली.” सुदैवाने बस एका पडक्या घरावर कोसळली असून त्या ठिकाणी कोणीही राहत नसल्याने मोठी हानी टळली.
 
दोन्ही अपघातांमुळे पालघरमध्ये एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून पुढील तपास सुरू आहे.