वर्धेतील बनावट नोटांचा छापखाना पोलिसांनी उधळला

*मुख्य आरोपी फरार, अल्पवयीनसह पाचशेच्या १४४ नोटा जप्त

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
fake-currency-printing-house : शहरातील गोंडप्लॉट येथील एका घराच्या तिसर्‍या मजल्यावरील खोलीत ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांच्या पथकाने शुक्रवार १४ रोजी रात्री १२.३० वाजता धाड टाकून पाचशेच्या १४४ बनावट नोटा आणि साहित्य जप्त केले. या कारवाईत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी ईश्वर यादव हा फरार झाला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी आज शनिवार १५ रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
wardha
 
मुख्य आरोपी ईश्वर यादव हा वर्धेतील केजाजी चौक, गोंड प्लॉट येथील डॉ. प्रकाश तळवेकर यांच्या घराच्या तिसर्‍या मजल्यावर किरायाने राहत होता. याच खोलीतून तो बनावट नोटांचा छापखाना चालवायचा. छापलेल्या नोटा धनराज धोटे, राहुल आंबटकर आणि एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून गावोगावी आठवडी बाजारात चलनात आणायचा. दरम्यान, धनराज धोटे आणि राहुल आंबटकर यांना मालेगाव नाशिक येथून बनावट नोटा चलनात आणताना पोलिसांनी अटक केली आणि या छापखान्याचे बिंग फुटले. त्यांच्याकडून जवळपास ५ ते ६ लाखांच्या ५०० रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या.
 
 
चौकशीदरम्यान सदर नोटांचा छापखाना वर्धेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मालेगाव पोलिसांनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्याशी संपर्क साधून बनावट नोटांच्या छापखान्याचे लोकेशन पाठविले. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांच्या चार पथकांनी डॉ. तळवेकर यांच्या घराला घेराव घातला. याठिकाणी एक अल्पवयीन मुलगा आढळून आला. घराची झडती घेतली असता ५०० रुपयांच्या १४४ बनावट नोटा आढळून आल्या. सोबतच एक प्रिंटर, दोन लाकडी फ्रेम, काचेची फ्रेम, पेपर, इंक बॉटल व छापखान्यासंदर्भात लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती जैन यांनी दिली. मालेगाव पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही जैन यांनी सांगितले.
 
 
आरोपीच्या शोधात तीन पथकं रवाना
 
 
मुख्य आरोपी ईश्वर यादव हा परप्रांतीय असून धनराज धोटे, राहुल आंबटकर आणि एका अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून बनावट नोटा बाजारात चलनात आणायचा. धनराज धोटे आणि राहुल आंबटकर यांना मालेगाव पोलिसांनी अटक केली. आपल्या साथीदारांना अटक झाल्याची माहिती मिळताच ईश्वर यादव हा महत्त्वाचे पुरावे घेऊन पसार झाला. त्याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले आहे. मुख्य आरोपीचा शोध घेऊन आणखी किती लोक यात सहभागी आहेत, याचा शोध घेण्यात येणार आहे.