नवी दिल्ली,
R.K. Singh suspended for six years भाजपाने कठोर निर्णय घेत माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे तसेच पक्षविरोधी वर्तनामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान आर.के. सिंह यांनी सतत पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून दूर जात सरकारवर टीका केली होती. विशेषतः, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर केलेले गंभीर आरोप आणि प्रशांत किशोर यांच्या विधानांना दिलेला खुला पाठिंबा यामुळे भाजपा अडचणीत आला होता.
प्रचाराच्या काळात त्यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका, पंतप्रधानांच्या सभांपासून स्वतःला दूर ठेवले. त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत होती. निवडणूक काळात त्यांच्यावर कारवाई केल्यास विरोधकांनी त्याचा प्रचारात गैरफायदा घेतला असता, म्हणून कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र निवडणूक संपताच पक्षाने शिस्तभंगाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले. आर.के. सिंह यांची नाराजी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वाढल्याचे सांगितले जाते. आरा लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिकरीत्या हे सूचित केले होते की त्यांचा पराभव विरोधकांमुळे नव्हे, तर पक्षातील काही घटकांच्या अडथळ्यांमुळे झाला. त्याच काळात भोजपुरी अभिनेता व गायक पवन सिंह यांच्या भाजपा प्रवेशाने स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलली. पवन सिंह यांच्या राज्यभरातील लोकप्रियतेमुळे आर.के. सिंह यांचा प्रभाव कमी झाला, ज्यामुळे त्यांची अस्वस्थता अधिकच वाढल्याचे बोलले जाते. या सर्व घडामोडींनंतर अखेर भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची निर्णायक कारवाई करत सहा वर्षांचे निलंबन जाहीर केले आहे.