भारतात ‘ई-पासपोर्ट’ युगाची सुरुवात...

इमिग्रेशन प्रक्रिया होणार आणखी वेगवान

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
The e-passport era in India भारत सरकारने पासपोर्ट सेवा कार्यक्रमाचा नवा टप्पा पीएसपी व्ही 2.0 लागू करत देशभरात ई-पासपोर्ट प्रणाली सुरू केली आहे. परदेश प्रवासासाठी आणि ओळख सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पासपोर्ट आता अधिक सुरक्षित, आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम स्वरूपात उपलब्ध होणार आहे. नवीन व्यवस्थेनुसार भारतातील सर्व पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये तसेच परदेशातील भारतीय दूतावासांत फक्त चिप-सक्षम ई-पासपोर्टच जारी केले जातील.
 

The e-passport era in India 
 
संग्रहित फोटो 
या ई-पासपोर्टमध्ये कव्हरमध्ये एक सूक्ष्म RFID चिप बसवलेली असून त्यात पासपोर्टधारकाची वैयक्तिक माहिती आणि बायोमेट्रिक तपशील सुरक्षितपणे संग्रहित राहतील. यामुळे दस्तऐवजांची सुरक्षितता वाढेल, बनावट पासपोर्ट रोखण्यात मदत होईल आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान इमिग्रेशन प्रक्रिया अधिक वेगवान होईल. यासंदर्भात नागरिकांमध्ये निर्माण झालेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे—जुने पासपोर्ट आता वैध राहतील का? सरकारने स्पष्ट केले आहे की जुने पासपोर्ट पूर्वीसारखेच वापरता येणार आहेत. त्यांची वैधता त्यांच्या मुदतीपर्यंत कायम राहील. मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज केल्यास नागरिकांना स्वयंचलितपणे ई-पासपोर्टच दिला जाईल.
नवीन अर्जदारांनाही कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया करावी लागणार नाही. विद्यमान अर्ज प्रणालीमध्येच त्यांना थेट चिप-आधारित पासपोर्ट मिळेल. कोणतेही वेगळे फॉर्म, पर्याय किंवा प्रक्रिया आवश्यक नसल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पीएसपी व्ही2.0 आणि ग्लोबल पासपोर्ट सेवा कार्यक्रमांतर्गत जारी होणाऱ्या या आधुनिक ई-पासपोर्टमुळे भारताची पासपोर्ट प्रणाली आणखी सक्षम, वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचे सरकारने नमूद केले आहे.