tiger जिल्ह्यातील वनांमध्ये वाघ सहज दर्शन देत असताना आता त्यांनी गाव शिवाराकडेही धाव घेतल्याचे पहावयास मिळत आहे. शुक्रवार १४ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास आणि शनिवार १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान एक वाघ त्याच्या शावकासह गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या मुरदोली महामार्गावरील बाघदेव मंदिर वनसंकुलात नजरेस पडले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली. हे लक्षात घेता गोरेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज गाढवे यांनी या मार्गावरून प्रवास करणार्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.
गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या मुरदोली येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. त्यामुळे येथे वन्य प्राण्यांचे विचरण असते. नागझिरा अभयारण्य देखील याच मार्गाला लागून आहे. त्यामुळे या मार्गावर वाघ आणि इतर वन्य प्राण्यांचे दर्शन होते. १४ नोव्हेंबर रोजी बाघदेव मंदिर परिसरात एक वाघ त्याच्या शावकांसह फिरताना दिसला, ज्यामुळे वाटसरूंमध्ये भीती निर्माण झाली. दोन्ही दिशांनी येणारी वाहने काही काळासाठी थांबविण्यात आली.tiger गोरेगाव वनविभागाचे पथक आज दिवसभर या मार्गावर गस्त घालत होते.