आदिवासी संस्कृतीला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

- आदिवासी विकास डॉ. अशोक उईके -जनजाती गौरव दिनानिमित्त चेतना परिषद

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
नागपूर,
chetna-parishad : आदिवासी देव, दैवत आणि अस्मिता यांची जपणूक करण्यासाठी व आदिवासी संस्कृतीला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. हे वैभव अधिकाधिक माध्यमातून पुढे येण्यासाठी समाजातील चिंतकांनी, संशोधकांनी यासाठी अधिक कटिबद्ध होण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
 
 
 
aadiwasi parishad
 
 
 
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त मानकापूर येथे आयोजित राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस अंतर्गत दुसर्‍या दिवशी चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैतराम पवार यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या या चेतना परिषदेस विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने, उपसचिव लक्ष्मणसिंह मडकाम, माजी आयपीएस अधिकारी मधुकरराव गावित, मध्यप्रदेश राजभवनच्या जनजाती डॉ. दीपमाला रावत, प्रकाश गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
सर्वसमावेशक विकासावर भर
आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक वुईके यांनी दिली. मध्यप्रदेशचे उपसचिव लक्ष्मणसिंह मडकाम यांनी सांगितले की, समुदायांनी शाश्वत व सर्वसमावेशक विकासावर भर दिला पाहिजे. भारतीय संविधानाच्या कलम ३४२ मधे आपल्या घटनात्मक हक्कांबद्दल जागरूक असले पाहिजे. जंगल संवर्धन करून आर्थिक प्रगती साध्य केली पाहिजे, आर्थिक दृष्ट्या साक्षर झाले पाहिजे. आपल्या प्राचीन संस्कृतीचे व अस्मितेचे रक्षण केले पाहिजे. त्यांनी आदिवासींच्या प्रथापरंपरामागील वैज्ञानिक दृष्टिकोन काय होता व आदिवासी कशाप्रकारे मूल्यांची जपणूक करणारी होती याचे महत्व विशद केले.
 
आदिवासी परंपरा जपण्यात स्त्रियांची भूमिका महत्त्वाची
 
 
मध्यप्रदेश राजभवनाच्या जनजाती डॉ. दीपमाला रावत यांनी मनोगत व्यक्त करताना आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांवर भाष्य केले. भारतीय आदिवासी स्त्रियांच्या वेशभूषेत विविधता आढळते. आदिवासी परंपरा जपण्यात स्त्रियांची भूमिका जेवढी महत्त्वपूर्ण आहे त्याच प्रमाणे आदिवासी मुलींनी आता प्रगती करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. निसर्ग रक्षण करणार्‍या आदिवासी स्त्रिया आहेत म्हणून आदिवासी कुटुंबात मातृसत्ताक अधिक स्थान असल्याने स्त्रियांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पद्मश्री चैतराम पवार यांनी आदिवासींना जल, जंगल आणि पर्यायाने पर्यावरण संवर्धनाकरिता सामूहिकरित्या प्रयत्न करून आपला विकास साध्य करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले.