लाल्या रोगाने कापूस पीकही धोक्यात

*सरकारी अनास्थेमुळे बळीराजा हतबल

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
आर्वी, 
red-blight : नैसर्गिक संकटांमुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांवर आता लाल्या रोगाचे संकट उभे ठाकले आहे. काशिमपूर, सर्कसपूर, निंबोली, टोणा, देऊरवाडा आदी परिसरातील शेतांतील कापसावर या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव दिसून येत आहे. कापसाची हिरवीगार पाने लालसर पडून वाळू लागली आहेत. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली असून उत्पादनावर परिणाम झाला आहे.
 
 
 
jlk
 
 
 
आधीच सोयाबीन पीक वाया गेल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी कापसावर भिस्त होती. मात्र, हातातोंडाशी आलेला घास लाल्या रोगाने हिरावून घेतल्याने शेतकर्‍यांची शेवटची आशाही मावळली आहे. या गंभीर परिस्थितीत शासकीय यंत्रणांचे ढिसाळ नियोजन आणि वेळकाढूपणा शेतकर्‍यांच्या संतापाला कारणीभूत ठरला आहे. शासकीय कृषी शाळा, कॉलेज, महाविद्यालये आणि कृषी शास्त्रज्ञांनी संभाव्य रोगराईबद्दल शेतकर्‍यांना वेळीच योग्य मार्गदर्शन केले नाही. संभाव्य रोगराईच्या बाबतीत शेतकर्‍याला वेळेत सतर्क केले असते आणि उपाययोजना सांगितल्या असत्या, तर आज ही बिकट परिस्थिती नकीच टळली असती. एकीकडे पीक संकटात असताना शासन शेतकरी प्रश्नांवर फारसे गंभीर दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांकडून व्यत केली जात आहे.
 
 
पीक संकटात असताना दुसरीकडे कापूस विक्रीचा प्रश्नही जटिल बनला आहे. भारतीय कापूस महामंडळाने खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली असली तरी अनेक शेतकर्‍यांचे अद्याप प्रमाणीकरण झालेले नाही. ज्यांनी नोंदणी केली त्यांच्या कापूस खरेदीसाठी दिरंगाई केली जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. घरी असलेला तुटपुंजा कापूसही सरकार खरेदी करत नसल्यामुळे शेतकर्‍यांना नाइलाजाने कमी भावात खाजगी व्यापार्‍यांना माल विकावा लागत आहे. लाल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, सीसीआयने नोंदणी प्रक्रिया जलद करून युद्धपातळीवर कापूस खरेदी सुरू करावी आणि कृषी विभागाने तत्काळ शेतकर्‍यांना लाल्या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मोफत औषध आणि मार्गदर्शन उपलब्ध करावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.