विकासाच्या मुद्यांवर होणार गोंदिया न.प.निवडणूक!

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
गोंदिया,
municipal-council-elections : तब्बल साडेतीन वर्ष प्रशासकराज असल्याने शहरातील विकास कामांच्या खोळंब्यासह मुलभूत सोयीसुविधा अभावी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता गोंदिया नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा मुहूर्त निघाला असून राजकीय पक्ष, इच्छूक कामाला लागले आहेत. तेव्हा रखडलेली विकास कामे, आवसून उभ्या असलेल्या समस्या अशा विविध मुद्द्यांना घेऊन यंदाची ही निवडणूक रंगणार असल्याचे चित्र दिसून येत असताना तशी अपेक्षाही गोंदियाकरांच्या चर्चेतून समोर येत आहे.
 
 
 
GONDIA
 
 
 
गोंदिया नगर परिषदेची स्थापना १९२० मध्ये झाली. सुरूवातीला १० नगरसेवकांची संख्या आता ४४ झाली. मध्यंतरी पालिका क्षेत्राचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत योजनेत करण्यात आला. त्यामुळे शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा होती. तथापी तसे झाले नाही. शहरात आजही अनेक समस्या, प्रश्न कायम असून विकास कामे प्रलंबित आहेत. त्यातच मागील साडेतीन वर्षात निवडणुका न झाल्याने पालिकेत प्रशासकराज होते. परिणामी नागरिकांच्या गैरसोयी, समस्यात भर पडत गेली. त्यामुळे सर्वांचेच लक्ष निवडणुकीकडे लागले होते. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय पक्षासह इच्छूकांनी नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरू केले आहे.
 
 
२ डिसेंबर रोजी मतदान होणार असतानाच सोमवार १७ नोव्हेंबर ही नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा सोमवारी रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होऊन प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. प्रचार काळात शहरवासियांना उमेदवार, पक्षाकडून मोठमोठी आश्वासने दिली जातील. परंतु याच काळात शहरातील समस्या, प्रश्न व प्रलंबित विकास कामाचाही उहापोह मांडला जाऊ शकतो. अतिक्रमणामुळे शहरातील अरूंद झालेले रस्ते, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघात, रस्त्यावरील खड्डे व गतिरोधकांची अनावश्यक संख्या, गटार योजनेमुळे झालेली रस्त्यांची दुरावस्था, सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यांची दुरावस्था, गढूळ पाणीपुरवठा, जुन्या उड्डाणपुलाचे रखडलेले बांधकाम, पालिकेला आजवर सोडविता न आलेला घनकचरा प्रकल्प अशा अनेक समस्या व त्यामुळे प्रत्येक प्रभागातील नागरिकांना होणारा त्रास हे मुद्दे कोणत्या उमेदवाराकडून सोडविले जातील, याची खातरजमा यंदा मतदारांकडून केली जाणार असल्याची शक्यता चर्चेत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व रिंगणातील इच्छूक उमेदवार मतदारांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच प्रचार करणार असल्याचे सध्या तरी दिसू लागले आहे. तर ही निवडणूक विकासाच्या मुद्यांवरच व्हावी, अशी अपेक्षा देखील गोंदियाकरांच्या चर्चेतून पुढे येत आहे.