‘ते’ व्यक्तव्य कोणा एकाला धरून नाही : खा. प्रफुल्ल पटेल

- भंडारा येथील वक्तव्याचे प्रसार माध्यमांसमोर स्पष्टीकरण

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
गोंदिया, 
praful-patel : खा. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा येथे काल, १५ नोव्हेंबर रोजी केलेल्या वक्तव्यांचा भंडारासह गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात चांगलेच पडसाद उमटत असून आज, १६ नोव्हेंबर रोजी खा. पटेल हे गाेंंदिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांनी भंडारा येथे केलेल्या वक्त्व्याचे प्रसार माध्यमांपुढे स्पष्टीकरण देत ते वक्तव्य कोणा एकाला धरून केले नसल्याचे सांगितले.
 
 
 
PATEL
 
 
 
जिल्ह्यातील दोन नगर परीषद व दोन नगर पंचायतीच्या निवडणूका लागल्या असून खा. पटेल यांनी आज, आपल्या रामनगर येथील निवासस्थानी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खा. पटेल यांनी काल, १५ नोव्हेंबर रोजी भंडारा येथे ‘कोणीही आपल्याला बाहुबली समजू नका’. गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या प्रत्येक नेत्याला व कार्यकर्त्याला मी जवळून ओळखतो. निवडणुका आल्या की अनेक नेते उमेदवाराकडे जातात, पैशाचा आमिष दाखवतात, सर्व पैशामुळे होत नाही.
 
 
 
लोकप्रियता महत्त्वाची असते, जनसामान्य लोकांची सेवा महत्त्वाची असते. त्यामागे लोक उभे असतात. पैसे दिले, पैसे खर्च केले तर निवडून येणार असं राजकारणात नसते. त्यातही काही अपवाद असतात, जनता सुद्धा पैशाच्या मोहात न पडून योग्य निर्णय घेतात, असे व्यक्तव्य केले होते. प्रसंगी त्यांना भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत युतीसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी दोन्ही जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. तसेच भंडारा जिल्ह्यात एका नगर परिषदेवर युती संदर्भाने चर्चा सुरू निर्णय झालेला नसल्याचे ते म्हणाले. तर निवडणुकीला एकटे समोर जात असताना युती धर्म पाळणार असल्याचे सांगत निकालानंतर मित्र पक्षांशी कसं जुळवता येईल यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्हणाले. प्रसंगी त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आज, रात्रीपर्यंत जाहीर करणार असल्याचे सूचक वक्तव्यही यावेळी केले.
 
 
पार्थ प्रकरणी अहवालानुसार कारवाई होणार
 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली येथे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पार्थ पवार प्रकरणावर माहिती दिल्याची चर्चा होती. यासंदर्भात बोलताना पटेल म्हणाले की, अजित पवार हे बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाच्या निमित्ताने अभिनंदन करण्यासाठी गृहमंत्र्यांना भेटले. यात दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही. पार्थ पवार जमीन प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. पोलिसही चौकशी करीत आहेत. यातंर्गत जे काही अहवाल येणार त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
 
 
काँग्रेसची स्थिती आयसीयूत असल्यासारखी
 
 
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाविषयी खा. पटेल यांना विचारले असता त्यांनी काँग्रेस पक्षाची अवस्था ही आयसीयूमध्ये असल्यासारखी झाली आहे. काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही. त्यामुळे काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली असल्याची टिका त्यांनी यावेळी ते म्हणाले.