मेळघाटमध्ये एका आठवड्यात दोन मातामृत्यू

आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण वादग्रस्त

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
धारणी, 
maternal-death-in-melghat : आदिवासी बहुल मेळघाटामध्ये बाल व मातामृत्यू कमी करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवण्यात येत असतानाही अशा घटना थांबत नाहीत. मागील सात दिवसांत दोन मातांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून चौकशीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने बालमृत्यूवरून विभागाला फटकारल्यानंतरच या दोन मृत्यूंची माहिती प्रशासनाने जाहीर केली.
 
 
 
AMT
 
 
 
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणात दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांनी उपचारास सहकार्य न केल्याचा दावा केला आहे. पण विभाग स्वतःच्या कारवाईची माहिती देत असतानाही, जबाबदारी कुटुंबांवर ढकलणे योग्य ठरते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्या प्रकरणात वनिता धिक्कर यांना सिकलसेलचा त्रास होता आणि त्या उच्च जोखमीच्या गर्भवती होत्या. पाच वेळा तपासणी झाल्यानंतर त्यांना अचलपूर येथे रेफर करण्यात आले, परंतु कुटुंबीयांनी त्यांना घरी नेले. प्रसूतीवेळीही रेफर करण्यास नकार देण्यात आला. प्रसूतीनंतरही रुग्णालयात न ठेवता घरी नेण्यात आले आणि २८ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
 
दुसऱ्या घटनेत राणी सावरकर या एचबीएसएजी रिअॅक्टिव्ह असून उच्च जोखमीच्या श्रेणीत होत्या. मे ते सप्टेंबरदरम्यान त्यांच्या पाच तपासण्या करण्यात आल्या. १७ सप्टेंबर रोजी त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे अचलपूरला नेण्यात आले. प्रसूतीनंतरच्या उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
 
 
आरोग्य प्रशासनाने प्रत्येक मातामृत्यूची चौकशी केली जाते आणि संबंधितांवर कारवाई झाल्याचे सांगितले आहे. मात्र आदिवासी समाजाचे समुपदेशन, योग्य वेळी उपचार आणि प्रभावी सुविधा देणे ही प्रशासनाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या मातामृत्यूंची जबाबदारी कुटुंबांवर ढकलण्यापेक्षा, सेवा व्यवस्थेतील त्रुटींवर शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक ठरते.