नागपूर,
mp-cultural-festival-2025 : ‘अपने ही रंग मी तुझको रंग दे’ हे भाग मिल्खा भाग या चित्रपटातील आपले आवडते गाणे ख्यातनाम गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या सुरेल आवाजात सादर करीत नागपूरकरांना आपल्या परफॉर्मन्सने आवाजात रंगवून टाकले. ‘हाऊसफुल्ल’ गर्दीने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दहावा दिवस चांगलाचा गाजला.
दोन वर्षांपूर्वी श्रेया घोषाल यांची खासदार सांस्कृतिक महोत्सव कॉन्सर्ट झाली होती. त्यांची आठवण काढताना श्रेया म्हणाली, या भव्य अशा महोत्सवात दोन वर्षांपूर्वी आले होते. येथील रसिक संगीताचे जाणकार आहेत. त्यामुळे गाणे निवडताना खूप विचार करावा लागतो. नितीन गडकरी यांनी यावर्षी परत एकदा आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून देखण्या आणि लाडक्या गायिकेला ऐकण्यासाठी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणाबाहेर रांगा बघायला मिळाल्या. वेळेपर्यंत कॉन्सर्टच्या पासेसची मागणी सुरूच होती. सायंकाळीं 5 वाजताच्या दरम्यान पूर्णपणे लोकांनी भरून गेले. तेवढ्याच संख्येने बाहेरही लोक प्रवेश करण्यासाठी ताटकळत उभे होते. आत बसायला जागाच नसल्यामुळे हजारो प्रेक्षकांना निराश व्हावे लागले. बाहेर चौकाचौकात लावलेल्या स्क्रीनवर अनेकांनी कार्यक्रम पाहून समाधान मानले.
श्रेयाचे मंचावर आगमन होताच एकच जल्लोष झाला. तिने सुन रहा है ना तू या गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात केली. लोकांनी मोबाईलचे लाईट ऑन करताचा ‘आकाशातील तारे जमिनीवर उतरले आहेत’, असे वाटत आहे असे ती म्हणाली.
तिने तुम क्या मिले, जादू है नशा है, ओ रंगरेज, दिवानी मस्तानी, मनवा लागे, पिंगा, बरसो रे या हिंदी लोकप्रिय गाण्यांसह जीव दंगला, बहरला हा मधुमास ही मराठी गीतेही सादर केली. मध्यांतरात श्रेया व तिचा सहकलाकार किंजल चॅटर्जी यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मराठी संगीतकार अजय-अतुल यांचे ‘जीव रंगला’ हे गीत गाण्यापूर्वी ती म्हणाली, जी जोडी खूप चांगले संगीतकार असून या त्यांच्या पहिल्याच फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. ते दोघे महोत्सवात येत आहेत याचा आनंद आहे.
आजच्या कार्यक्रमाची सुरवात केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते मा. श्री. नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कांचनताई गडकरी, टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक पार्था मित्रा, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, पुण्यनगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, तरूण भारत चे संपादक शैलेश पांडे, डॉ मदन कापरे, डॉ पिनाक दंदे, दिलीप रोडी, प्रफुल्ल देशमुख, अंकुर सीडचे शेंबेकर या सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून केली. श्रेया घोषाल आणि त्यांच्या टीमच्या कलाकारांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुलकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.
स्थानिक कलाकारांची उत्तम प्रस्तुती
कार्यक्रमाची सुरुवात गिटारवादक पीयुष भुते याच्या वादनाने झाली. त्यानंतर प्रलय बँडच्या कलाकारांनी श्री गणेश वंदना सादर केली. या सर्व कलाकारांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धन्यवाद नागपूर - नितीन गडकरी
मागील दहा वर्षांपासून नागपूरकरांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवावर भरभरून प्रेम केले आहे. नागपूरकरांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मी सर्वांचे नागपूरवासियांचे आभार मानतो. आज श्रेया घोषाल यांच्या कार्यक्रमालाही लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. पटांगणावर जितके लोक होते तितकेच लोक बाहेर उभे होते, याची मला जाणीव आहे. ज्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला नाही, त्यांची मी क्षमा मागतो. भविष्यात सर्वांना कार्यक्रमांचा आनंद घेता येईल, अशी व्यवस्था केली जाईल, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.