भोंदू बाबाची तंत्रविद्या... बलात्कार आणि पैशांचा पाऊस...

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
नाशिक,
Ganesh Baba arrest पाथर्डी गावाजवळील तुळजाभवानी मंदिरानजीक भवानी माथा परिसरात तंत्रविद्येच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाचे कारनामे उघडकीस आले आहेत. जमिनीतून सोने काढून देण्याचे आमिष दाखवत आणि पूजाविधींच्या माध्यमातून सर्व संकटे दूर करतो असे सांगत या तथाकथित मांत्रिकाने एका विवाहित महिलेला अनेक वर्षे लैंगिक शोषणासोबतच तब्बल पन्नास लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गणेश जयराम जगताप उर्फ सम्राट मांत्रिक गणेश बाबा (४७, रा. घारणगाव, निफाड) याच्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात बलात्कार, फसवणूक तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
 

Ganesh Baba arrest  
तक्रारीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे दारूचे व्यसन घालवून देतो या कारणाने जगताप तिच्या संपर्कात आला. तंत्रपूजा, स्मशानभूमीत विधी तसेच विविध चमत्कारिक दावे करून त्याने महिलेचा विश्वास जिंकला. याच काळात “तू मला आवडतेस” अशा प्रकारच्या बोलण्याने आणि मानसिक दबाव निर्माण करून त्याने तिच्याशी जवळीक साधली. पुढे एका पुस्तकात तिच्या कुटुंबीयांची नावे असल्याचे सांगत, शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर त्यांचा बळी जाईल अशी धमकी देत आरोपीने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले.
 
 
यासोबतच बंगला Ganesh Baba arrest  मिळवून देतो, फ्लॅट घेऊन देतो, पैशांचा पाऊस पाडून देतो, तसेच जमिनीतून सोने काढून देतो अशा अनेक खोट्या आश्वासनांनी जगतापाने पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांकडून सुमारे पन्नास लाख रुपये उकळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने केलेली फसवणूक केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आणि शारीरिक स्तरावरही गंभीर स्वरूपाची आहे.आरोपी सध्या फरार असून इंदिरानगर पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, जगतापाला पकडण्यात आल्यानंतर अनेक इतर महिलाही पुढे येऊन तक्रारी दाखल करण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीही त्याच्यावर अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती.गणेश जगतापाने पाथर्डी गावाजवळ ‘बडेबाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट’च्या नावाने संस्था स्थापन केली होती आणि भाविकांची दिशाभूल करण्यासाठी मंदिरही उभारले होते. या ठिकाणी अनेक भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीही त्याच्याविरोधात गुन्हे नोंदवले गेले होते आणि त्याला अटकही झाली होती.या नवीन प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा, तांत्रिक विधींच्या नावाने होणारी फसवणूक आणि महिलेच्या शोषणाचा मुद्दा पुढे आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदूबाबांच्या मागे लागू नये, तसेच संशयास्पद हालचाली दिसताच तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.