चंद्रपूर,
shantakka-contact-day : भारतीय संस्कृतीत कुटुंब हा समाजाचा पाया आहे. कुटुंब सुदृढ असेल, तर समाज आणि राष्ट्रही सशक्त राहते. आज कुटुंबव्यवस्थेत दिसणार्या कमतरतांना दूर करण्यासाठी कुटुंब प्रबोधन अत्यावश्यक आहे. ते समाज आणि राष्ट्रनिर्मितीचे सर्वात महत्त्वाचे घटक असून, काळाची गरजही आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी येथे केले. राष्ट्रसेविका समितीच्या चंद्रपूर विभागातर्फे न्यू इंडिया कॉन्व्हेंट येथे रविवार, 16 नोव्हेंबर रोजी संपर्क दिनानिमित्त गणवेश शाखेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
शांताक्का पुढे म्हणाल्या, भारताचा प्रत्येक कण पवित्र आहे, ही भावना माझ्या मनात दृढ असून, या पवित्र भूमिच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याची प्रेरणा मला भारत दर्शनातून मिळाली. आपले जीवन कसे असावे, वेळ कोणासाठी द्यावा, आपण कोण आहोत आणि आपले कर्तव्य काय आहे, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
शांताक्कांनी महिलांनी राष्ट्रीय स्वयंसेविका संघात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. हिंदू धर्म-संस्कृतीचे रक्षण, कुटुंबातील संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या तत्वांवरही त्यांनी भर दिला. लक्ष्मीबाई केळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, ‘चित्र-पात्र-वस्त्र-क्षेत्र’ या चार बिंदूंचे महत्व सेविकांना समजावून सांगितले.
कौटुंबिक ज्ञान आणि संस्कार जपणे आवश्यक असून, हिंदू संस्कृती जिवंत राहण्यासाठी कुटुंब प्रबोधन अत्यावश्यक आहे. भारत हा त्याच्या भारत रूपातच कायम राहिला पाहिजे, असे त्यांनी शेवटी नमूद केले. प्रास्ताविक व परिचय चंद्रपूर विभाग कार्यवाहिका वनिता मडपुवार यांनी केले. कार्यक्रमास सेविका, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.