वर्धा,
bird-week : जिल्ह्यात नुकताच पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. याच दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात पक्षीप्रेमींनी पक्षी निरीक्षण केले. याच निरीक्षणात तब्बल ११० प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन झाल्याने पक्षी मित्रांमध्ये आनंद संचारला आहे.
दिवंगत पक्षीतज्ज्ञ अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर हा जन्मदिवस तर १२ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त पक्षीतज्ज्ञ दिवंगत डॉ. सालीम अली यांचा जन्मदिवस आहे. या दरम्यान महाराष्ट्रात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. वर्धा जिल्ह्यात बहार नेचर फाउंडेशनच्या पुढाकाराने ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा समारोप १२ रोजी सालोड हिरापूर येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वनौषधी उद्यानात झाला.
या सप्ताहात बहारद्वारे पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण अधिवासात दररोज पक्षीनिरीक्षण करण्यात आले. तसेच बोर व्याघ्र प्रकल्प तसेच जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पक्षी व पर्यावरण या विषयावर सचित्र सादरीकरणासह संवाद साधण्यात आला. बुद्ध टेकडी, पवनार, रोठा तलाव, दिग्रस तलाव, सुसूंद तलाव, रहाटी तलाव, बोर व्याघ्र प्रकल्प, शिरूड तलाव या प्रमुख ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात आले. या पक्षी निरीक्षणादरम्यान पक्षीप्रेमींना तब्बल ११० प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन झाले आहे. पक्षी सप्ताहदरमान दर्शन झालेल्या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने पट्टकादंब, छोटी लालसरी, भुवई बदक, सरगे बदक व थापट्या आदी हिवाळी पाहुण्या पक्ष्यांचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले.
५०० हून अधिक निसर्गप्रेमींचा सहभाग
जिल्ह्यात हळूहळू का होईना पण सध्या पक्षी, वन्यजीव व निसर्ग संगोपनार्थ एक लोकचळवळ उभी होऊ पाहत आहे. नुकताच साजरा करण्यात आलेला पक्षी सप्ताह व पक्षी निरीक्षण उपक्रमात ५०० हून अधिक निसर्गप्रेमींचा सहभाग होता.