सोयाबीनची हमीभाव खरेदी शेतकर्‍यांसाठी आधारवड

११०७ शेतकर्‍यांची नोंदणी, उद्यापासून खरेदी

    दिनांक :16-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड, 
soybean-guaranteed-price : खुल्या बाजारात सोयाबीन दर कोसळले, व्यापार्‍यांच्या तोंडावर स्मित उमटले. पण शेतकर्‍यांच्या कपाळावरील चिंता रेषा मात्र खोल गेल्या. उत्पादन खर्च वर्षागणिक वाढतोय, पावसाचे लहरी चाळे थांबत नाहीत आणि व्यापार्‍यांनी टाकलेल्या कमी दराच्या फासात शेतकरी पुन्हा अडकू लागले होते. याच पार्श्वभूमीवर ५३२८ रुपयांच्या सोयाबीन हमीभावाने शेतकर्‍यांच्या हाताला आधार मिळाला आणि म्हणूनच तालुयात हमीभाव खरेदीकडे कल झपाट्याने वाढताना दिसतोय.
 
 
 
 JK
 
 
 
कारंजा खरेदी - विक्री संघाकडे आलेल्या आकडेवारीनुसार, हमीभावावर विक्रीसाठी तब्बल ११०७ शेतकर्‍यांची नोंदणी अभासी पूर्ण झाल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक आशिष ठाकरे यांनी दिली. खुले बाजारात सोयाबीनला सध्या जास्तीत जास्त ३८०० ते ४१०० रुपयांचा दर मिळत असताना व्यापारी भाव नाही, क्वालिटी नाही, मागणी नाही अशी कारण सांगत दर खाली खेचतायत. त्यामुळे शेतकर्‍यांचे हमीभावानुसार १२०० ते १४०० रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी थेट हमीभाव खरेदी केंद्राकडे वळतोय. कारण १२०० ते १४०० रुपयांचा फरक म्हणजे छोटा विषय नाही. यंदाच्या हंगामातील खर्च आणि नुकसानीनुसार हा फरक शेतकर्‍याला अक्षरशः उभं करू शकतो. त्यामुळेच शेतकर्‍यांचा सोयाबीन हमीभावा ने विक्री करण्याकडे कल वाढत आहे.
 
 
 
खरेदी-विक्री संघाकडून सोमवारपासूनच सोयाबीन खरेदी सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केंद्राकडून शेतकर्‍यांना मोजणीसाठी संदेश पाठवले जातील. शेतकर्‍यांना त्या संदेशाच्या तारखेप्रमाणे सोयाबीन घेऊन केंद्रावर हजर रहावे लागणार आहे. असे असले तरी शेतकर्‍यांच्या मनात मात्र मोजणी वेळेत होईल का? पेमेंट किती दिवसात येणार? गर्दी वाढली तर क्रमांक कसा मिळेल? असे अनेक प्रश्न कायम आहेत.