मुंबई,
Annu Kapoor controversy ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने चर्चेत असतात. प्रियांका चोप्रापासून तमन्ना भाटियापर्यंत अनेक कलाकारांवर टिप्पणी केल्यानंतर आता त्यांनी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल केलेले विधान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या अन्नू कपूर यांनी काही वर्षांपूर्वी गोव्यातील एका कार्यक्रमात घडलेला किस्सा सांगितला. त्या कार्यक्रमात त्यांना नवाजुद्दीन सिद्दीकीची स्टेजवरून मुलाखत घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला नवाजच्या रसायनशास्त्रातील उच्च शिक्षणामुळे ते प्रभावित झाले होते. मात्र मुलाखतीदरम्यान नवाजुद्दीनने दिलेल्या उत्तरांमुळे ते निराश झाले.
मुलाखतीचा माहोल हलका करण्यासाठी अन्नू कपूर यांनी नवाजुद्दीनला त्यांच्या प्रेमजीवनाविषयी प्रश्न विचारला. यावर नवाजने, “कित्येक अशा आल्या आणि गेल्या…” असे उत्तर दिल्याचा दावा अन्नू कपूर यांनी केला. “ज्या पद्धतीने त्यांनी हे सांगितले, त्यावरून मला वाटले की तो एक छिछोरा माणूस आहे. ‘अनेक जण आले आणि गेले’ म्हणजे नेमकं काय? हे अत्यंत अयोग्य उत्तर होतं,” असे अन्नू कपूर यांनी म्हटले.
त्यांच्या मते Annu Kapoor controversy नवाजुद्दीन कोणत्याही प्रश्नाला सविस्तर उत्तर देत नव्हता आणि संपूर्ण संभाषण जवळपास त्यांनाच पुढे न्यावे लागत होते. कार्यक्रमानंतर आयोजकांनी “एकट्याच बोलत होतात,” अशी तक्रार केल्यावर अन्नू कपूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यक्तीला मुलाखतीसाठी आणलंत? जो ना स्वतःचा आदर करत होता, ना माझा,” असे ते म्हणाले.त्याच पॉडकास्टमध्ये अन्नू कपूर यांनी अभिनेत्री तमन्ना भाटियाबद्दल केलेले पूर्वीचे वादग्रस्त विधानही पुन्हा चर्चेत आले. एका अप्रस्तुत आणि लैंगिक स्वरूपाच्या टिप्पणीमुळे ते यापूर्वी ट्रोल झाले होते. आता नवाजुद्दीनबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या केंद्रस्थानी आले आहेत.अन्नू कपूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण होणारा वाद आणि त्यावर होत असलेली जनमताची प्रतिक्रिया पाहता, या चर्चेची पुढील दिशा काय राहील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे.