आर्वी,
Arvi Congress AB form controversy आर्वी शहर जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. दोन आमदार आणि एक खासदार असलेल्या आर्वीत नगर पालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्मसाठी एक नगराध्यक्ष आणि २५ नगरसेवकांना ताटकळत ठेवण्यात आल्याचा आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. आज सकाळपर्यंत आघाडी करण्याची कोणतीही माहिती आपल्याला मिळाली नसल्याने आम्ही नगराध्यक्षासह नगरसेवकांची यादी स्वतंत्र लढण्यासाठी तयार केली होती अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.
जिल्ह्यात महाविकास आघाडी सहाही नगर पालिकांमध्ये एकत्र लढते आहे. आर्वीत काँग्रेसमधून शरद पवार गटात जाऊन खासदार झालेले अमर काळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे नियोजन करण्यात आले. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार आम्ही नगराध्यक्षपदाकरिता ३ आणि नगरसेवक पदांकरिताची एकत्र बसुन यादी तयार केली. त्याला मान्यताही देण्यात आली. परंतु, आज १७ रोजी नगर पालिकेकरिता उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या तारखेला दुपारी २.३० वाजेपर्यंत आपल्याकडे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म पाठवण्यात आले नाही. आम्ही एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवक वाट शेवटच्या घटकापर्यंत वाट पाहत राहिलो. परंतु, आमच्या हाती एबी फॉर्म आले नाही. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे उमेदवार या निवडणुकीपासुन वंचित राहणार आहेत. याची आम्ही काँग्रेस श्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाकरिता अनधिकृत व्यतीने अर्ज दाखल केला असल्याचा आरोपही अग्रवाल यांनी केला आहे. आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार प्रणोती प्रकाश जयसिंगपुरे ठरला होता. उमेदवारांच्या नावावर एकमत झाले होत. त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत मोहड, शहर अध्यक्ष सुधाकर भुयार आणि आपली स्वत:ची स्वाक्षरी असल्याचे अग्रवाल यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासोबत संपर्क केला असता तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी हे राजकारण आहे. ज्यांना एबी फॉर्म मिळाला नाही, ते असे आरोप करीत असतात, असे तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. आम्ही नगराध्यक्षपदाकरिता बाळा जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली तसेच ६ जागां आम्ही महाविकास आघाडीत लढत असल्याचे चांदूरकर यांनी सांगितले.