पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र मुंढे

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
वर्धा,
Dr. Rajendra Mundhe, येत्या २९ व ३० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक समीक्षक डॉ. राजेंद्र मुंढे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन स्वागताध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी एका सभेत ही घोषणा केली.
 

Dr. Rajendra Mundhe, 
भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सहकार्याने लोक शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोक महाविद्यालयाला हे संमेलन आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे. गेल्या चार दशकांपासून वर्धेच्या वाड्मय संस्कृतीच्या वर्धनासाठी अव्याहत सक्रीय असलेले डॉ. मुंढे यांची विविध स्वरूपाची पाच पुस्तके प्रकाशित असून, त्यांना राज्य शासनाचा १९९८ लाच उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कारासह प्रतिष्ठेचे साहित्य, पत्रकारिता, सांस्कृतिक व सामाजिक पुरस्कार मिळालेले आहेत.
लोक महाविद्यालयाच्या परिसरात नियोजित आचार्य विनोबा भावे साहित्य नगरीत संमेलन २९ व ३० नोव्हेबर रोजी होत आहे. कथाकथन, चर्चासत्र, तीन परिसंवाद, कविसंमेलन, प्रकट मुलाखत चित्र प्रदर्शन आणि वाचक श्रोते संवाद, अशी भरगच्च मेजवानी वर्धेकर रसिकांना लाभणार आहे. दरम्यान, या संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार, याकडे जिल्ह्यातील साहित्य वर्तुळाचे लक्ष लागून होते. या सभेला संमेलन स्वागताध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, प्रकाश भोयर, प्रा. अशोक मेहेरे, शेषराव बिजावार, गुणवंत डकरे, दामोदर राऊत, प्रा. उल्हास लोहकरे, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. महेंद्र सहारे, संयोजक प्रा. मोहन सोनुरकार, सहसचिव संजय कोटेवार, आयोजन समितीचे प्रा. मेघा चुटे-ब्राह्मणकर, प्रा. सीमा चौधरी यांची उपस्थिती होती.
 
 
लिहिणार्‍या हातांचा व नि:सीम साहित्य क्षेत्र सेवकाचा सन्मान : मुंढे
 
 
ही निवड म्हणजे गेल्या चार दशकात वर्धेच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात निष्ठेने व नि:सीमपणे कार्य करणार्‍या साहित्य सेवकांच्या कार्याची पावती आहे. हा केवळ माझा सन्मान नसून, वाड्मययीन कार्य तसेच लिहिणार्‍या सर्व हातांचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया लेखक डॉ. राजेंद्र मुंढे यांनी व्यत केली आहे.