मुंबई,
Mahima Chaudhry अभिनेत्री महिमा चौधरीने योग्य वेळी निदान आणि प्रभावी उपचारांच्या मदतीने ब्रेस्ट कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महिमाने आपल्या आरोग्यप्रवासाविषयी मोकळेपणे सांगत कॅन्सरच्या लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘यंग वुमेन ब्रेस्ट कॅन्सर कॉन्फरन्स 2025’मध्ये तिला आपला अनुभव शेअर करण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते.
महिमाला 2022 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. त्यावेळी कोणतीही लक्षणे नसतानाही ती केवळ वार्षिक रुटीन चेकअपसाठी गेली असता हा आजार उघडकीस आला. “मला कॅन्सरची कोणतीही लक्षणं जाणवत नव्हती. मी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंगसाठीही गेले नव्हते. रुटीन तपासणीदरम्यान अचानक कॅन्सरचं निदान झालं. कॅन्सर हा असा आजार आहे, जो स्वतः ओळखता येत नाही; तो फक्त चाचण्यांमधूनच कळतो. त्यामुळे नियमित तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे.”
तिने भारतातील कॅन्सरवरील उपचारपद्धतीत झालेल्या सकारात्मक बदलांवरही भाष्य केले. गेल्या काही वर्षांत उपचार अधिक आधुनिक झाले असून अनेक औषधं स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याचे तिने सांगितले. “फार्मास्युटिकल कंपन्यांकडून आता चांगली मदत मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरविषयीची जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कॅन्सरचा सामना करणाऱ्या अनेकांच्या कथा मला प्रेरणा देतात,” असे महिमा म्हणाली.
निदानाचा Mahima Chaudhry रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरचा क्षण तिने आयुष्य बदलून टाकणारा अनुभव म्हणून वर्णन केला. “पहिल्या क्षणी मला वाटलं की माझं संपूर्ण जगच ढासळलं आहे. आंतरिक शक्ती क्षीण झाल्यासारखी वाटत होती. परंतु मी स्वतःला सावरलं, धैर्याने उपचार घेतले आणि शेवटी त्या आजारावर विजय मिळवला,” असे ती म्हणाली.आज पूर्णपणे तंदुरुस्त असलेली महिमा चौधरी कॅन्सरविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावत आहे. तिच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून योग्य वेळी तपासणीचे महत्त्व ती सतत अधोरेखित करत आहे.