अर्जुनी मोरगाव,
Matru Seva Sangh award 2025 मातृसेवा संघ, नागपूर, लेले-भावे परिवार पुरस्कृत पद्मश्री कमलाबाई होस्पेट आणि श्रीमती वेणूताई नेने या संस्थाव्दयींच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा वर्ष २०२५ साठीचा ३१ वा संस्थापिकाव्दयी पुरस्कर तालुक्यातील सावरटोला येथील सामाजिक कार्यकर्त्या सरिता दुधराम मेश्राम यांना १५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील पंचवटी वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
मातृ सेवा संघाच्या संस्थापिका पद्मश्री कमलाताई होस्पेट यांची पुण्यतिथी व वेणूताई नेने यांच्या जयंतीचा कार्यक्रमात मातृ सेवा संघाच्या कोषाध्यक्ष इरावती दाणी यांच्या हस्ते तसेच संघाचे अध्यक्ष डॉ. अरुणा बाभुळकर, सचिव डॉ. लता देशमुख, लिलावती चितळे, अरुण लेले यांच्या उपस्थितीत सरिता मेश्राम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरिता मेश्राम यांनी सावरटोला गावात महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकासासाठी उल्लेखनीय काम केले आहे. तसेच महिलांना तलाव जीवंत ठेवण्यासाठी आणि मासेमारी व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. सोबतच ग्राम विकास, महिलांचे हक्क आणि अधिकारांसाठी लढा दिला आहे. महिलांना समाजात मानसन्मान मिळवून दिला आहे. त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांचे काम समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्वाचे ठरले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मातृसेवा संघाने त्यांना ३१ वा संस्थापिकाव्दयी पुरस्कर देऊन गौरवित केले आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.