चंद्रपूर,
municipal elections 2025 जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व एका नगरपंचायत निवडणुकीचे नामांकन अर्ज दाखल करण्याचा सोमवार, 17 नोव्हेंबर शेवटचा दिवस होता. विविध राजकीय पक्षांच्या नगराध्यक्ष व सदस्यपदाच्या उमेदवारांनी मोठ्या उत्साहात, वाजतगाज मिरवणूक काढून आपले नामांकन सादर केले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांची उपस्थित होते.
वरोडा :municipal elections 2025 तालुक्यात नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पृष्ठभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पदाकरिता सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापूर्वी एका उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने अध्यक्षपदाच्या अर्जाची संख्या 8 झाली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया राजुरकर यांनी सकाळी 10 वाजता मोठे विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेत भव्य मिरवणुकीसह उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना आशिष ठाकरे यांनीही नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत खा. प्रतिभा धानोरकर, काँग्रेस शहराध्यक्ष विलास टिपले, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली तसेच माजी नगरसेवक गजानन मेश्राम होते. तर शिवसेना शिंदे गटातर्फे ज्योती मत्ते, शिवसेना उबाठातर्फे सोनम नाशिककर, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे मनिषा नेरकर व रंजना पारधिवे यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज सादर केले. तर, वसुधा शंभूनाथ वरघने यांनीही अपक्ष व भाजपच्यावतीने नगराध्यक्ष पदासाठी आपले दोन अर्ज दाखल केले. भाजपच्या अर्जाला एबी फॉर्म जोडला नाही त्यामुळे तो फेटाळला जाईल. परंतु, दुसरा अर्ज कायम राहिल्यास भाजपामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बल्लारपूर : ब्रम्हपुरी नगर परिषद निवडणुकीकरिता भाजपाच्या उमेदवार रेणुका दुधे यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज सादर केला. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा आदी उपस्थित होते. तर काँग्रेसकडून अल्का वाढई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोजीदा दाताजुद्दीन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वंदना तामगाडगे, वंचित बहुजन पक्षाकडून ज्योत्सना वाळके, आम आदमी पार्टीकडून मंजुषा दोंतुलवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
राजूरा : काँग्रेस-शेतकरी संघटना व आरपीआय समर्थित नगरविकास विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरूण धोटे यांनी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपातर्फे राधेश्याम अडानिया यांनी शेवटच्या दिवशी सोमवारी भव्य रॅली काढत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी आ. देवराव भोंगळे, अर्चना भोंगळे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे राजेंद्र डोहे यांनी नगराध्यक्ष पदासाठी व अन्य नगरसेवक पदाकरिता जुळवाजुळव करीत अल्पावधीत राजकीय चुरस निर्माण केल्याने आता राजुरा नगर परिषदमध्ये तिहेरी लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. राजुरा येथे नगराध्यक्ष पदाकरिता एकूण 6 नामांकन दाखल झाले आहे.
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून प्रा. सुयोग बाळबुधे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी नामांकन सादर केले. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तनय देशकर, माजी नगराध्यक्ष रीता उराडे, जिल्हा सचिव साकेत भानारकर, शहर महामंत्री मनोज भूपाल, प्रा. अशोक सलोटकर, सचिन बुराडे आदी उपस्थित होते. तर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार यांनी आपल्या समर्थकांसह आपले नामांकन सादर केले. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, वंचित आघाडीचे प्रेमलाल मेश्राम यांच्यासह काँग्रेस, वंचित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर शिवसेना (उबाठा), आरपीआय (खोरिप), आरपीआय (गवई) आदी संघटनांनी मिळून तयार केलेल्या तिसरी आघाडीच्यावतीने मिलिंद भन्नारे यांनी नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन दाखल केले.
भद्रावती : भद्रावती नगर परिषद निवडणुकीकरिता भाजपाकडून अनिल धानोरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहिर करण्यात आली. तर भाजपा शहराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या अॅड. सुनील नमोजवार यांना काँग्रेस-वंचित आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी बहाल करण्यात आली. तसेच शिवसेना शिंदे गटातर्फे प्रफुल्ल चटकी, शिवसेना उबाठा गटाकडून नंदू पढाल, तर आम आदमी पार्टीकडून डॉ. विशाल शिंदे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाली. सर्व उमेदवारांनी सोमवारी आपले नामांकन दाखल केले.
मूल : मूल नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी प्रा. डॉ. किरण कापगते यांनी अर्ज सादर केला. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, माजी न. प. नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी भाजपा मूल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर उपस्थित होते. तर काँग्रेसकडून एकता प्रशांत समर्थ, शिवसेना शिंदे गटातर्फे भारती राखडे, तर बसपाकडून चैताली मद्रिवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी नमांकन अर्ज दाखल केला. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज सादर केले नाही.
नागभीड : नागभीड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपातर्फे प्रा. लोमेश दुधे यांनी आपले नामांकन सादर केले. तर काँग्रेसकडून.स्मिता खापर्डे, राष्ट्रवादी (अजित पवार) गटातर्फे आत्माराम खोब्रागडे, वंचितकडून चंदन कोसे, प्रहारकडून ऋषभ खापर्डे, आरपिआयाचे केशव रामटेके, तर अपक्ष उमेदवार रोमी कटारे, प्रा. डॉ. अनमोल शेंडे, सुनील मेश्राम यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले. नागभीड नगर परिषदेतील 10 प्रभागासाठीनगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी 123, तर नगराध्यक्ष पदाकरिता 16 अर्ज सादर करण्यात आले आहे.
घुग्घूस : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीत भाजपाकडून पूजा दुर्गम, काँग्रेसतर्फे दीप्ती सोनटक्के, उबाठा गटाच्या वतीने शोभा ठाकरे, बिएसपीतर्फे आरती पाटील या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले.चिमूर : चिमूर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे सारिका मनीष नंदेश्वर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भिसी नगरपंचायतीसाठी भाजपाचे अतुल वासुदेव पारवे, तर काँग्रेसचे आकाश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बल्लारपुरात काँग्रेसमध्ये बंडखोरी
बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची नगराध्यक्षपदाची उमेदवारी अल्का वाढई यांना देण्यात आल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी यांची सून चैताली मुलचंदानी यांनी उबाठाची मशाल हाती घेत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील कुल्दीवार यांच्या पत्नी मीनाक्षी कुलदीवार यांनीही बंडखोरी करीत नगराध्यक्ष पदाकरिता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला.
आज अर्जाची छाननी
मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. 21 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे व उमेदवारांना बोधचिन्ह वाटप करण्यात येणार आहे. बोधचिन्ह मिळाल्यानंतर प्रचारासाठी केवळ 6 दिवसाचा कालावधी असल्यामुळे उमेदवारांची दमछाक होणार आहे.