तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरेचाही उमेदवारी अर्ज दाखल

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड,
Transgender Shravani Hingaspure शहराच्या राजकीय इतिहासात आज एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण घडला. तृतीय पंथीय समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणार्‍या आणि सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षीत घटकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या श्रावणी हिंगासपुरे यांनी प्रभाग क्रमांक ९ अ मधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील तृतीय पंथीयांची ही पहिलीच उमेदवारी ठरण्याची शयता असून, शहराच्या निवडणूक इतिहासातही हा पहिलाच सहभाग नोंदवला जात आहे. श्रावणी अनासपुरे हे कारंजा शहरात कोणत्याही परिचयाची गरज नसलेले नाव असून, गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहून त्यांनी समाजमनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
 
 
 
Transgender Shravani Hingaspure
 
शहरातील गणेशोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दुर्गादेवी विसर्जन या सोहळ्यात ती नियमितपणे उपस्थित राहून खिचडी वाटप, मीनरल वॉटर वितरण, सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम अशा उपक्रमांचा पुढाकार घेत आली आहे. तृतीय पंथीयांचा आवाज राजकीय आणि शासकीय यंत्रणेत पोहोचावा यासाठी श्रावणी यांनी केलेले प्रयत्न लक्षणीय आहेत. शहरातील तृतीय पंथीयांचा मतदारयादीत समावेश व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. परिणामी कारंजा शहरात तृतीय पंथीय समाजाची नोंदणी सुनिश्चित करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. उमेदवारी दाखल करताना श्रावणी हिंगासपुरे यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद आणि समाधान दिसत होते. विजय - पराजय महत्त्वाचा नाही तर आपल्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी उमेदवार म्हणून उभं राहता येणं, हीच मोठी जीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच उमेदवारीची संधी दिल्याबद्दल त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले.