ठाण्यात मनोरुग्णालयाच्या बांधकामात सापडली प्राचीन कलाकृती

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
ठाणे,
Ancient artwork found in Thane ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात ऐतिहासिक वारसा समोर आला आहे. ठाणे शहराचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर करण्याच्या कामांच्या पार्श्वभूमीवर जुन्या इमारती हटवल्या जात आहेत. या प्रक्रियेत पाडकाम होत असलेल्या जुन्या बंगल्याच्या ठिकाणी प्राचीन ठेवा सापडला आहे. मनोरुग्णालयाच्या परिसरात सुमारे अडीच ते तीन फूट उंच आणि सव्वा ते दीड फूट रुंद प्राचीन दगड आढळला आहे. या दगडावर पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या शेजारी उभा असलेला शिष्य दिसतो. दगडाच्या दोन्ही बाजूंना खांब असून, त्याच्याजवळ उभ्या असलेल्या नर्तिका देखील कोरल्या आहेत. या दगडावरचे कलाकृतीचे काम अत्यंत सुंदर असून, त्याची वयोमान अंदाजे प्राचीन काळातले आहे.
 
 
Ancient artwork found in Thane
 
मनोरुग्णालयाच्या इतिहासातील या ठेव्याचा काहीही दस्तऐवजीकरण रुग्णालयाकडे नाही, त्यामुळे त्याचा संदर्भ शोधण्याची मागणी करण्यात येत आहे. या परिसरात यापूर्वीही ब्रिटिशकालीन मुखवट्याचे दगड बांधकाम पाडताना आढळले होते, त्यामुळे अजूनही काही ऐतिहासिक अवशेष दडलले असण्याची शक्यता आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय 1901 मध्ये सुरू करण्यात आले.
या ठिकाणी 1895 सालची कोनशिला असून, रुग्णालय बांधकामासाठी नवरोतमदास माधवदास यांनी सुमारे 35 टक्के निधी योगदान दिले होते. पुढे हे रुग्णालय मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यासाठी सेवाभावाने कार्यरत राहिले. सध्या मनोरुग्णालयाच्या आधुनिक इमारतीसाठी जुनी वास्तू पाडण्यात येत आहे, आणि या कामात सापडलेल्या प्राचीन दगडाने परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून दिली आहे. या शोधामुळे ठाण्यातील ऐतिहासिक वारशावर नवीन प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.