सुकमा,
Naxalite Hidma killed in Sukma 'रेड टेरर'ला अखेरचा धक्का बसला आहे. कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा याला सुरक्षा दलांनी ठार केले आहे. हिडमा सोबतच आणखी पाच नक्षलवाद्यांनाही सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केले. सुकमा जिल्ह्याजवळील आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये तासभर गोळीबार सुरू होता. या चकमकीत सहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार अद्याप सुरू आहे.
पोलिस सूत्रांच्या माहिती नुसार ही चकमक आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर झाली. या जंगलात अनेक नक्षलवाद्यांची माहिती पोलिसांना मिळाल्याने गुप्त माहितीनुसार शोध मोहीम राबवण्यात आली होती. आज सकाळी ६:३० ते ७ वाजेच्या सुमारास मरेदुमिल्ली मंडलातील जंगलात ही चकमक सुरू झाली. सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई राबवली. हिडमा हा सर्वात धोकादायक नक्षलवाद्यांपैकी एक मानला जात असे. तो सुरक्षा दलांवर आणि नागरिकांवर झालेल्या २६ नक्षलवादी हल्ल्यांचा सूत्रधार होता, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. हिडमावर पोलिसांनी ५० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. या चकमकीत हिडमाची पत्नी राजे यांचा देखील मृत्यू झाला.
हिडमाचा जन्म १९८१ मध्ये सुकमा जिल्ह्यात झाला. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या गनिमी कावा बटालियनचे नेतृत्व केल्यानंतर तो सीपीआय-माओवादीच्या केंद्रीय समितीचा सदस्य झाला. बस्तर भागातील हिडमा हा या समितीचा एकमेव सदस्य होता. झिरम व्हॅली हल्ल्यानंतर हिडमाचे नाव प्रथम चर्चेत आले. त्यानंतर त्याने अनेक नक्षलवादी हल्ले केले आणि दशके त्याचे नाव संपूर्ण प्रदेशात चर्चेत राहिले.