नवी दिल्ली,
Raj Thackeray's party will be dissolved उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध गंभीर याचिका दाखल केली आहे. याचिकेत ते म्हणतात की राज ठाकरे यांनी अमराठी भाषिकांविरोधात चिथावणीखोर भाषणे आणि प्रक्षोभक वक्तव्ये केले आहेत. या याचिकेद्वारे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तसेच मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांना धारेवर धरले. कोर्टाने याचिकेतील वैधतेवर प्रश्न उपस्थित करत “उत्तर भारतीय” आणि “अमराठी भाषिक” असे शब्द याचिकेतून वगळण्याचे स्पष्ट निर्देश दिले. न्यायमूर्तींनी विचारले की, मुळात या शब्दांमुळे वाद निर्माण करण्याची गरज काय होती.
कोर्टाने स्पष्ट केले की हा वाद फक्त द्वेषपूर्ण भाषण या शब्दाद्वारे व्यक्त करता येतो आणि हा शब्द याचिकाकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसा आहे. यावरुन याचिकाकर्त्यांनी हे दोन शब्द वगळण्याची तयारी दर्शवली. या बदलानंतर हायकोर्टाने याचिकेची नोंद घेतली आहे. तसेच कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली असून चार आठवड्यांच्या आत यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकेत सुनील शुक्ला यांनी म्हटले आहे की राज ठाकरे गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अमराठी भाषिकांना टार्गेट करत आहेत. त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील उत्तर भारतीय-हिंदी भाषिक लोकांविरुद्ध धमक्या आणि हिंसेच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मनसेची मान्यता रद्द करावी, असे निवडणूक आयोगाकडे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या नोटीसमुळे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.