पुणे,
Sterilization for leopard control महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे राज्य सरकारने यावर गंभीर पावले उचलली आहेत. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात बिबट्यांचा मानवी वस्तीवर हल्ल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दर दोन दिवसांनी बिबट्यांचे दर्शन किंवा हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात दुपारी १.३० वाजता बैठक बोलावली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने बिबट्यांच्या नसबंदीला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची मान्यता मिळवली असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. तसेच बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चंद्रपूरच्या धर्तीवर पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

या उपाययोजनेत अत्याधुनिक सॅटेलाइट कॅमेरे बसवले जाणार आहेत आणि बिबट्या जवळ आल्यास गावांमध्ये सायरनद्वारे तातडीचा अलर्ट देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वनमंत्री नाईक यांनी पुणे, नाशिक व अहिल्यानगर येथील वनविभागांतील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि त्या वेळी बिबट्यांच्या हल्ल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजनांचा प्रस्ताव सादर केला. जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे, बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. अतिसंवेदनशील भागात एआय प्रणालीचा वापर करून बिबट्यांची हालचाल, स्थान व संख्या नोंदविण्यासाठी ड्रोन सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे बिबट्यांच्या हल्ल्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.