निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना धक्के!

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
छ.संभाजीनगर,
Uddhav Thackeray before elections छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार स्वर्गीय आर. एम. वाणी यांचा मुलगा सचिन वाणी यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून आज ते भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. सचिन वाणी यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला महत्त्वाचा झटका बसला आहे.

uddhav thackeray 
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांनंतर महापालिका निवडणुका होणार आहेत, जानेवारी अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात वेगाने बदल घडत आहेत. सचिन वाणी यांच्या भाजप प्रवेशामुळे वैजापूर शहरात ठाकरे गटाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येण्याची चर्चा सुरु आहे. गेल्या वर्षी संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवणारे राजू शिंदे यांनी देखील ठाकरे गटाचा आधार सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सचिन वाणी यांनी शिवसेनेच्या समर्थकांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. काही दिवसांपासून पक्ष सोडण्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून, सचिन वाणी यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी देखील भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना ठाकरे गटाला मोठा आघात मानला जात आहे.