तिवसा,
leopard-wathoda-khurd : वाठोडा खुर्द, बनसापुर व भांबोरा या तीनही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट दिसल्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत स्थानिक शेतकर्यांनी वनविभागाकडे निवेदन सादर करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली होती. शेतकरी आणि ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत तिवसा वर्तुळातील वनविभागाचे संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाचे अधिकारी जि. डी. जांभे यांनी वनरक्षक एम. डी. गवई व एम. एन. डायरे यांच्यासह संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. सरपंच, पोलिस पाटील, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि महिलांशी संवाद साधून परिस्थितीचे सखोल आढावा घेण्यात आला. पाहणीदरम्यान नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत असले तरी वनविभागाने लगेचच जनजागृती करत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
//नागरिकांना मार्गदर्शन
पथकाने बिबट दिसलेल्या ठिकाणी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याच्या सूचना देत खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले. संध्याकाळी व पहाटेच्या वेळात एकटे बाहेर जाणे टाळावे, विशेषतः मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये.
घराच्या आवारात व शेताच्या कडेला असलेली झुडपे, उंच गवत, अनावश्यक कचरा यांची साफसफाई करावी, जेणेकरून बिबट वावरासाठी आडोसा तयार होणार नाही. जनावरांना घराजवळ व सुरक्षित ठिकाणी मजबूत बांधून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरातील अंधारे कोपरे, गोठे, अंगण रात्री प्रकाशमान ठेवावेत, जेणेकरून वन्यजीवांची हालचाल सहज ओळखता येईल. कुणाला बिबट दिसल्यास स्वतः कोणतीही धोकादायक कृती न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा तसेच १९२६ या राज्यस्तरीय आपत्कालीन हेल्पलाईनवर कॉल करावा, असे आवाहनही करण्यात आले.
अफवा पसरवू नयेत, फोटो-व्हिडीओसाठी गर्दी करू नये आणि परिसरात समन्वयाने व जबाबदारीने वर्तन करावे यावरही भर देण्यात आला. निरीक्षणानंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत परिसर पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांना सर्व आवश्यक सूचना देण्यात आल्या असून वनविभाग पुढील काही दिवस नियमित गस्त, रात्रीचे निरीक्षण आणि हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवणार आहे.