नागपूर,
recruitment-for-assistant-professors अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), नागपूर महानगरातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव राजू हिवसे यांना सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ७५:२५ हे गुणसूत्र लागू करण्यात आले आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव व संशोधनासाठी ७५ गुण ठेवत किमान ५० गुण मिळाल्यावरच उमेदवार मुलाखतीस पात्र ठरणार आहे. मात्र, सेट-नेट किंवा पीएचडी उत्तीर्ण उमेदवारांना सुरुवातीला शिकवण्याचा अनुभव किंवा संशोधन नसेल, तर त्यांना या ७५ पैकी गुण मिळण्याची शक्यता कमी असल्याने अनेक पात्र उमेदवार प्रक्रियेबाहेर राहणार, असा एबीव्हीपीचा आक्षेप आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ठरवलेले ५०:५० चे गुणसूत्र अधिक न्याय्य व सर्वसमावेशक असून त्याचाच अवलंब करावा, अशी मागणी संघटनेने उपस्थित केली. नव्या पद्धतीत ग्रामीण भागातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तुलनेने कमी गुण मिळण्याची शक्यता असल्याने हा निर्णय ग्रामीण विद्यार्थ्यांवर “दुजाभाव करणारा” असल्याचेही एबीव्हीपीने नमूद केले. हा निर्णय तातडीने सुधारल्या न गेल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अभाविपने दिला आहे. recruitment-for-assistant-professors निवेदन देताना विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके, महानगर मंत्री वीरेंद्र पौणीकर, प्रा. किशोर पाटील, प्रा. दामोदर द्विवेदी, डॉ. अमृता इंदुरकर यांच्यासह शोधार्थी, प्राध्यापक व कार्यकर्ते उपस्थित होते.