मुंबई,
Cold wave : राज्यात थंडीने अचानक जोर पकडला असून पारा झपाट्याने खाली घसरत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला असून, पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असून, महाराष्ट्रातही याचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे.
परभणी आणि जेऊरमध्ये तापमान ७ अंशांपर्यंत खाली गेले आहे. जळगाव, निफाड, आहिल्यानगर, पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि वाशिम येथेही पारा १० अंशांखाली नोंदला गेला. दुसरीकडे दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या भागात अतिवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत असून दाट धुक्याने परिसर व्यापला आहे. सकाळच्या वेळी काही मीटर अंतरावरही दिसणे कठीण झाले असून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मुंबईतही तापमानात मोठी घसरण झाली असून सांताक्रूझ येथे १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. आगामी दोन दिवस मुंबईत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
जळगावमध्येही थंडीने यंदा विक्रम मोडला असून २३ वर्षांतील सर्वात कमी तापमान- ७.१ अंश सेल्सिअस- नोंदवले गेले. डिसेंबर आणि जानेवारीत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पुण्यात देखील कडाक्याची थंडी जाणवत असून शहराचे तापमान ९.४ अंशांपर्यंत खाली आले आहे. हवेलीमध्ये तर ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे पुणे परिसरातील गारठा आणखी वाढवत आहेत.
एकूणच राज्यभर थंडीचा जोर वाढला असून, पुढील काही दिवस तापमानात मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात.