वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास मिळणार विमा रक्कम

वन्य प्राण्यांमुळे व मुसळधार पावसाने होणार्‍या नुकसानीचा पीक विम्यात समावेश

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
गोंदिया,
crop insurance पीक विमा योजनेत केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल करत शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. वन्य प्राण्यांमुळे होणारे पीक नुकसान तसेच मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पिके पाण्याखाली जाणे या दोन्ही प्रकारच्या नुकसानींचा समावेश आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत करण्यात आला आहे. ही तरतूद खरीप हंगाम २०२६ पासून लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
 
 

पीक विमा  
 
 
शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणार्‍या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी सरकारकडून पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती. वादळ, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणार्‍या नुकसानीसाठी भरपाई पीक विमा योजनेच्या माध्यमातून दिली जाते. आता यामध्ये आणखी बदल करत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे पीक नुकसान तसेच मुसळधार पावसामुळे होणार्‍या नुकसानाची भरपाईही शेतकर्‍यांना मिळेल. रानडुक्कर, हरीण, वानरे, रोही, निलगाय, हत्ती यासारख्या वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होते. आता या नुकसानीला स्थानिक जोखीम श्रेणी अंतर्गत पाचवा अतिरिक्त विमा कव्हर देण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयामुळे वनक्षेत्रांतील शेती असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत पिकांचे जिओ-टॅग केलेले फोटो पीक विमा अ‍ॅपवर अपलोड करणे आवश्यक राहणार आहे.crop insurance फोटो अपलोड केल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांकडून त्वरित पंचनामा आणि पडताळणी केली जाईल.
या राज्यांना मिळणार लाभ
योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यातील शेतकर्‍यांना होईल. राज्य सरकारांना पिकांचे नुकसान करणार्‍या वन्य प्राण्यांची अधिकृत यादी जाहीर करावी लागेल. सर्वाधिक नुकसान होणारे जिल्हे आणि विमा केंद्रे ओळखावी लागतील. यामुळे आगामी हंगामात विमा प्रक्रिया अधिक अचूक आणि प्रभावी होईल.