‘फार्मर कप’ स्पर्धा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी संधी
पाणी फाउंडेशन व कृषी विभागाचा उपक्रम
दिनांक :19-Nov-2025
Total Views |
गोंदिया,
farmer cup competition पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा ‘फार्मर कप’ आता गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. शेतकरी गटांना शाश्वत आणि शास्त्रशुद्ध शेतीकडे वळवून त्यांचे उत्पादन वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
राज्य शासनाने यंदापासून पाणी फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणार्या ‘फार्मर कप’ या उपक्रमाची व्याप्ती वाढवून, प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता गोंदिया जिल्ह्यात देखील पाणी फाउंडेशन व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी यांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. त्यानंतर शेतकर्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही स्पर्धा राबविणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे, उपविभागीय कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, रुपेश मेश्राम यांनी सांगितले.
काय आहे ‘फार्मर कप’ स्पर्धा...
‘फार्मर कप’ ही महाराष्ट्रातील शेतकरी गटांमध्ये शाश्वत आणि शास्त्रशुद्ध शेती करण्यासाठी आयोजित केलेली एक मोठी स्पर्धा आहे. अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या पाणी फाउंडेशनने ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या यशानंतर ही स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश शेतकर्यांचे उत्पादन वाढवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे हा आहे. याआधी वॉटर कप ही स्पर्धा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, जामनेर या तालुक्यांमध्ये राबविण्यात आली होती.
कोणते शेतकरी घेऊ शकतो सहभाग...
फार्मर कप म्हणजे गटशेतीची स्पर्धा आहे. गटशेतीमध्ये किमान ११ सदस्य आणि किमान १५ एकर क्षेत्र असणारा कोणताही गट स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.farmer cup competition या स्पर्धेचा प्रमुख हेतू शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आहे. मजुरी खर्चात बचत करण्यासह स्वस्तात खते व बियाण्याची उपलब्धता करण्याचा हेतू आहे.