हदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत छाननी पूर्ण

नप अध्यक्ष पदासाठी 12, तर नगरसेवक पदासाठी 102 उमेदवार पात्र

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
hadgaon-municipal-council : हदगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दाखल झालेल्या नामांकन अर्जांची छाननी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत नगरपरिषद प्रांगणात पार पडली. या छानणी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 21 अर्जांपैकी 12 उमेदवार पात्र ठरले असून, नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 182 अर्जांपैकी 102 उमेदवारांची पात्रता निश्चित झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.
 
 
 
y19Nov-Hadgav
 
 
 
नप अध्यक्षपदासाठी पात्र ठरलेल्यांमध्ये वर्षा देशमुख, कुमुद सोनुले, रोहिणी वानखेडे, सीमा घाळाप्पा, अरुणा गिरी आणि कविता जोशी यांचा समावेश आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान काही अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांचा अभाव, पक्षाच्या ‘बी’ फॉर्मची गैरसोय तसेच अपूर्ण तपशील यामुळे अनेक अर्ज बाद झाले असल्याचे समजते.
 
 
दरम्यान, नगरसेवक पदाच्या छाननीत काही प्रभागांत विशेष राजकीय समीकरणे समोर आली. भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात काही प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिसून आले. तसेच केवळ तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे रणनीती आखत 15 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरवले असून, हे सर्व उमेदवार पात्रही ठरल्याचे दिसून आले आहे.
 
 
छाननीदरम्यान प्रभाग क्रमांक 10 मध्ये एका उमेदवाराने भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांचे बी फॉर्म जोडल्याचे एक वेगळे प्रकरणही समोर आले. नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत 10 ते 17 नोव्हेंबर अशी होती. 18 नोव्हेंबर रोजी छानणी झाल्यानंतर आता 25 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, त्या दिवशीच निवडणुकीतील नेमकी स्पर्धा स्पष्ट होणार आहे.