एचटीबीटी कापसाला अनुमती देण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई

खासदार संजय देशमुख यांचा आरोप

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Sanjay Deshmukh : गेली 20 वर्षे केंद्र सरकार एचटीबीटी कापसाला अनुमती देण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला.
 
 

y18Nov-Sanjay-Deshmukh 
 
 
 
केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपिंदर यादव यांनी एचटीबीटी कापसाला अनुमती देण्याबाबत विचार करीत असल्याचे फेब्रुवारी 2025 मध्येच कळवले. खासदारांनी केंद्र सरकारचे पर्यावरण मंत्री भूपिंदर यादव, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी व राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही पत्र पाठवले आहे.
 
 
खा. देशमुख म्हणतात, यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या कापसाचे निंदन करण्यासाठी कमी पडते. जिल्ह्यात कापूस पेरणी 5 लाख हेक्टर आहे. जुलैमध्ये 21 दिवस पाऊस असतो. जिल्ह्यात कापसाचे रोज 50 हजार हेक्टर निंदण करायला 37 लाख 50 हजार मजूर लागतात. जिल्ह्याची लोकसंख्या 31 लाख आहे. एचटीबीटी कापसाचे रोज 50 हजार हेक्टर तणनाशक फवारणीसाठी 1 लाख मजूर लागतात.
 
 
महिकोने एचटीबीटी कापसाला अनुमतीसाठी केलेल्या अर्जावर पर्यावरण मंत्रालयाच्या अनुवांशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने 27 जुलै 2022 तज्ञ समितीची स्थापना केली.
 
 
अर्जात महिको खालील बाब नमूद केली. एचटीबीटी कापसाच्या चाचण्या 2008 आणि 2009 मध्ये घेतल्या. उत्तर आणि दक्षिण विभागात वर्ष 2012 मध्ये तीन ठिकाणी चाचण्या घेतल्या. क्षेत्रीय चाचणी निष्कर्षांनुसार, एचटीबीटी कापसाचे तण व्यवस्थापन कार्यक्षम आहे.
 
 
अनुवंशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने 9 जून 2025 ला स्थापित तज्ञ समितीची पुनर्रचना केली. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 6 महिने कालावधी देण्यात आला. अनुवंशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समिती एचटीबीटी कापसाला अनुमती देण्याबाबत दिरंगाई करत असल्याचे असल्याचे खा. संजय देशमुख यांनी म्हटले आहे.
 
 
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी, बियाणे उत्पादक, राज्य सरकारे, कृषी विद्यापीठे व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वैज्ञानिकांशी कापूस उत्पादनातील समस्यांबाबत 11 जुलै 2025 रोजी कोईम्बतूर येथे जाहीर संवाद साधला.
 
 
नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे ह्यांनी एचटीबीटी कापसाच्या अनुमतीचा मुद्दा अधोरेखित केला. महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिक कोकाटे यांनी एचटीबीटी कापसाला अनुमती देण्याची मागणी बैठकीत केली.
 
 
कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, देशात अप्रमाणित कापसाची लागवड वाढत असल्याचे सांगून, एचटीबीटी कापसाबाबत पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह या बैठलीला उपस्थित होते.