अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकी ईडीच्या कोठडीत

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Jawad Siddiqui in ED custody अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद अहमद सिद्दीकी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोठडीत पाठवले आहे. या कारवाईच्या आधी दिल्ली-एनसीआर प्रदेशात मंगळवारी विद्यापीठाशी संबंधित व्यक्तींवर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. जवाद सिद्दीकी यांना अटक दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणासाठी नव्हे, तर मनी लाँड्रिंग प्रकरणासाठी करण्यात आली आहे. ईडीने अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जवाद सिद्दीकी यांना पीएमएलए २००२ अंतर्गत अटक केली. तपासात मिळालेल्या पुराव्यांनुसार, विद्यापीठ सतत विद्यार्थ्यांची खोटी नोंदणी करत होते आणि बनावट मान्यता दाखवून लाखो रुपयांचा लाभ कमावत होते. विद्यापीठाने या प्रकारच्या खोट्या दाव्यांद्वारे ४१५ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले असल्याचे आढळले.
 
जवाद अहमद सिद्दीकी
 
 
तपासात असे दिसून आले की २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये विद्यापीठाने ३०.८९ कोटी आणि २९.४८ कोटी रुपये देणग्या म्हणून दाखवले. २०१६-१७ पासून विद्यापीठाने उत्पन्नाचा एक भाग शैक्षणिक उत्पन्न म्हणून दाखवायला सुरुवात केली, तर २०१८-१९ मध्ये हे उत्पन्न २४.२१ कोटी रुपये झाले आणि २०२४-२५ मध्ये ते ८०.०१ कोटींवर पोहचले. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या दोन एफआयआरच्या आधारे तपास सुरु करण्यात आला. या एफआयआरमध्ये विद्यापीठाने NAAC मान्यता आणि UGC संबंधित खोटे दावे केले असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. UGC ने स्पष्ट केले आहे की अल फलाह विद्यापीठ फक्त कलम 2(f) अंतर्गत राज्य खाजगी विद्यापीठ म्हणून सूचीबद्ध आहे आणि कलम 12(B) अंतर्गत मान्यता मिळवण्यासाठी कधीही अर्ज केलेला नाही.
 
 
अल फलाह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना ८ सप्टेंबर १९९५ रोजी झाली. संस्थापक जवाद सिद्दीकी सुरुवातीपासून ट्रस्टचे विश्वस्त आहेत आणि संपूर्ण गटावर त्यांचा प्रभाव आहे. विद्यापीठ आणि त्याच्याशी संबंधित महाविद्यालये या ट्रस्टअंतर्गत येतात. ट्रस्टचा विस्तार १९९० च्या दशकापासून झाला, पण वास्तविक आर्थिक क्षमता यास अनुरूप नव्हती. ईडीच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, डिजिटल उपकरणे, महत्त्वाची कागदपत्रे आणि अनेक शेल कंपन्यांचे पुरावे जप्त करण्यात आले. तपासात असेही आढळले की ट्रस्टचा निधी कौटुंबिक कंपन्यांकडे वळवला जात होता, तर जवादच्या पत्नी आणि मुलांच्या मालकीच्या कंपन्यांना बांधकाम व केटरिंगचे कंत्राट दिले जात होते. पैशांचे लेअरिंग, फसवे व्यवहार आणि बेकायदेशीर व्यवहार या सर्व गोष्टी तपासात समोर आल्या आहेत.
 
जवाद सिद्दीकी यांनी ट्रस्ट आणि त्याच्या आर्थिक निर्णयांवर वैयक्तिक नियंत्रण ठेवले असून विविध मार्गांनी बेकायदेशीर संपत्ती लपवली आणि वळवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या जवाद सिद्दीकी यांना कोठडीत पाठवले असून ईडीची चौकशी सुरू आहे आणि तपासाद्वारे अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.