मतदारांच्या बोटांवर शाई ऐवजी मार्करचे ‘मार्किंग’

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
markers-on-voters-fingers : निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदारांच्या बोटांवर पारंपारिक शाईने चिन्हांकित केले जातात. मात्र, आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी एक विशेष मार्कर पेन वापरला जाणार आहे. जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीत २ लाख ७६ हजार ६८७ मतदार असून या मतदारांच्या बोटांवर शाई ऐवजी मार्कर पेनने चिन्हांकित केले जाणार आहे.
 
 
 
j
 
 
 
जिल्ह्यात सहा नगरपरिषदांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. वर्धा नगरपरिषदेत ८९ मतदान केंद्रांवरून ४३ हजार १३८ पुरुष तर ४४ हजार ८६६ महिला असे ८८ हजार १३ मतदार मतदान करणार आहेत. हिंगणघाटमध्ये ४७ हजार २६५ पुरुष आणि ४७ हजार ९१ असे ९४ हजार ३५६ मतदार, आर्वीमध्ये ४३ मतदान केंद्रांवरून १८ हजार २१९ पुरुष व १८ हजार १८८ महिला असे ३६ हजार ४०७ मतदार आहेत. पुलगावमध्ये ३२ मतदान केंद्रांवर १४ हजार १९९ पुरुष तर १४ हजार १६६ महिला असे २९ हजार ६५ मतदार मतदान करतील. देवळी येथील २० मतदान केंद्रांवर ८ हजार १६७ पुरुष तर ८ हजार २९१ महिला असे १६ हजार ४५८ मतदार आहेत. सिंदी रेल्वे नपत १९ मतदान केंद्रांवर ६ हजार १३४ पुरुष तर ६ हजार २५४ महिला असे १२ हजार ३८८ मतदार मतदान करणार आहेत. अशा जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेतील एकूण ३०७ मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी येणार्‍या मतदारांच्या बोटांवर या विशेष मार्कर पेनने चिन्हांकित केले जाणार आहे.
 
 
नप निवडणुकीत पहिल्यांदाच प्रयोग
 
 
नगरपरिषद निवडणुकीत पहिल्यांदाच या प्रकारच्या मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या विशेष मार्कर पेनची शाई अत्यंत गडद आणि जाड आहे. एकदा मतदारांच्या बोटावर चिन्हांकित झाल्यानंतर तो पुन्हा मतदान करू शकणार नाही. मतदान प्रक्रियेत अनियमितता टाळण्यासाठी याचा वापर केला जात आहे. गेल्यावर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी या विशेष मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता.
 
 
निवडणूक साहित्यांची तयारी पूर्ण
 
 
नगरपरिषद निवडणुकीसाठी फार कमी वेळ शिल्लक आहे. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात ३०७ मतदान केंद्रे आहेत. तालुकानिहाय कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सील पेपर, स्ट्रिप्स आणि विशेष टॅग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी अंदाजे ९७० मार्कर पेनची गरज भासणार आहे.