नोएडा,
Meenakshi Hooda in boxing finals ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. एका ऑटो ड्रायव्हरच्या मुलीने इतिहास रचत अंतिम फेरीत दमदार प्रवेश केला आहे. ४८ किलो वजनी गटातील मीनाक्षी हुड्डा हिने कोरियाच्या बेक चो-रोंगवर ५-० अशी एकतर्फी मात करून सुवर्णपदकाच्या आशा अधिक दृढ केल्या. सामान्य कुटुंबातील मीनाक्षीने जागतिक पातळीवर पोहोचत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

स्पर्धेदरम्यान भारताच्या अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. माजी विश्वविजेती अरुंधती चौधरीने दीड वर्षानंतर आंतरराष्ट्रीय मंचावर परतताना तीन वेळा विश्वचषक पदक जिंकलेल्या लिओनी मुलरचा पराभव करत भक्कम पुनरागमन केले. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण आक्रमकता दाखवून तिने जर्मन प्रतिस्पर्धीला बाद केले. आपल्या विजयानंतर अरुंधती म्हणाली की, पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीतील पराभवानंतर आणि मनगटावर शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने रिंगमध्ये उतरणे ही तिच्यासाठी मोठी मानसिक जिद्द होती. अंकुश पंघलने (८० किलो) ऑस्ट्रेलियाच्या मार्लोन सेव्होनला ५-० ने हरवत अंतिम फेरी गाठली. नुपूरनेही (८० किलो) आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत युक्रेनच्या मारिया लोव्हचिन्स्काचा पराभव केला. परवीनने (६० किलो) दिवसातील सर्वात मोठा अपसेट करत पोलंडच्या वर्ल्ड बॉक्सिंग कप रौप्यपदक विजेत्या रायगेल्स्का अनेता एल्जबिएटावर ३-२ अशी निसटती पण अत्यंत महत्त्वाची विजयी मात केली.
आता पुढील फेरीत प्रितीला (५४ किलो) ऑलिंपिक पदक विजेती आणि तीन वेळा विश्वविजेती हुआंग हसियाओ-वेनचा सामना करावा लागणार आहे, तर स्वीटी बोरा (७५ किलो) हिची लढत ऑस्ट्रेलियाच्या एम्मा-सू ग्रेट्रीशी होणार आहे. नरिंदर आणि नवीन देखील अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज असून भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत आपली मजबूत उपस्थिती दाखवली आहे. भारताचे अजून एक खेळाडू अभिनाश जामवाल आपली मोहीम युक्रेनच्या एल्विन अलीयेव्हविरुद्ध सुरू करणार असून, या संपूर्ण स्पर्धेत भारतीय बॉक्सिंगला नवीन ऊर्जा, नवीन चेहरे आणि जागतिक दर्जाची कामगिरी मिळत आहे.