११ हजार मेसेज, २० हजार कॉल...मुनावरने सांगितले सत्य

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Munawar told the truth कॉमेडियन आणि अभिनेता मुनावर फारुकी गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. मंगळवारपासून इंटरनेटवर एक मोबाईल नंबर वेगाने व्हायरल होत होता आणि तो मुनावर फारुकी यांचा असल्याचा दावा केला जात होता. अनेकांनी हा नंबर मुनावरचा लीक झाला असल्याचे सांगत त्यांना सतत कॉल आणि मेसेज पाठवायला सुरुवात केली. पाहता पाहता ही चर्चा इतकी वाढली की मुनावर फारुकी यांना स्वतः पुढे येऊन सत्य स्पष्ट करावे लागले.
 
 

Munawar Faruqui 
बुधवारी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या स्टोरीद्वारे मुनावर यांनी सांगितले की त्यांना त्या व्हायरल नंबरवर गेल्या काही तासांत तब्बल २०,००० हून अधिक कॉल आले आहेत. शिवाय ११,००० पेक्षा जास्त व्हॉट्सअॅप मेसेजही सतत येत होते. इतके मोठ्या प्रमाणात कॉल-मेसेज येऊ लागल्यामुळे मेटाने त्या संबंधित व्हॉट्सअॅप नंबरला संशयित समजून ब्लॉक केले, अशी माहितीही त्यांनी दिली.
यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ माजली असताना, मुनावर यांनी स्पष्ट केले की त्यांचा वैयक्तिक नंबर लीक झालेला नाही. प्रत्यक्षात, त्यांची वेब सिरीज फर्स्ट कॉपी च्या दुसऱ्या सीझनसाठी ही एक ठरवून आखलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. Amazon आणि MX Player यांच्या टीमने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी “नंबर लीक” हा प्रचाराचा एक नवा फंडा वापरला होता. या नंबरवर कॉल करणाऱ्यांना कॉल रेकॉर्डिंगमधून फर्स्ट कॉपीची जाहिरात ऐकू येत होती, असे मुनावर यांनी उघड केले.