नगराध्यक्ष ५२ तर नगरसेवकपदासाठी ८५५ उमेदवार रिंगणात

*छाननीत नगराध्यक्ष २० आणि नगरसेवकांचे १४७ अर्ज बाद

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
वर्धा,
municipal-council-elections : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेच्या निवडणुकीकरिता १७ रोजी अर्ज दाखल झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी छाननी प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदासाठी २० आणि सदस्यपदासाठी १४७ उमेदवारांचे अर्ज अवैध घोषित करण्यात आले. त्यामुळे आता ६ नगरपरिषदांमध्ये अध्यक्षपदाचे ५२ तर ८५५ नगरसेवक निवडणूक रिंगणात उभे आहेत. २१ नोव्हेंबर ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
 
 
 
hgt
 
 
 
जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्षपदासाठी ७२ आणि नगरसेवक पदासाठी १००२ अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी करण्यात आली. वर्धा नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी १५ आणि सदस्यपदासाठी २३५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी नगराध्यक्ष ३ तर नगरसेवकांचे २९ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी १२ आणि नगरसेवकपदासाठी २०७ उमेदवार रिंगणात आहेत. हिंगणघाट नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी १३ आणि नगरसेवक पदासाठी २४८ नामांकन दाखल झाले होते. छाननी दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ४७ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे येथे १२ नगराध्यक्ष तर २३१ नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत.
 
 
आर्वी नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी १२ तर नगरसेवकपदासाठी ११८ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत नगराध्यक्षपदासाठी ५ आणि नगरसेवक पदासाठी १४ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी ७ आणि नगरसेवक पदासाठी १०४ उमेदवार रिंगणात आहेत. पुलगावमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १७ आणि नगरसेवक पदासाठी २१८ नामांकन आले होते. छाननीत नगराध्यक्ष पदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी ७९ अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे रिंगणात नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी १३९ उमेदवार रिंगणात आहे. देवळीमध्ये नगराध्यक्षपदासाठी ८ आणि नगरसेवकपदासाठी ७८ उमेदवारांनी अर्ज भरले. छाननीत नगराध्यक्षपदासाठी २ आणि नगरसेवकपदासाठी ३ अर्ज रद्द करण्यात आले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी ६ आणि नगरसेवकपदासाठी ७५ उमेदवार रिंगणात आहेत. सिंदी रेल्वे नपत नगराध्यक्ष पदासाठी ७ आणि नगरसेवक पदासाठी १०४ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीदरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी सर्व अर्ज वैध असल्याचे आढळून आले. नगरसेवक पदासाठी ५ अर्ज रद्द करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी ७ आणि नगरसेवक पदासाठी ९९ उमेदवार रिंगणात आहेत.
 
 
जिल्हा न्यायालयात अपील
 
 
नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी २० आणि नगरसेवक पदासाठी १४७ असे एकूण १६७ नामांकन अवैध ठरविण्यात आले आहेत. तरीही इच्छूक उमेदवार जिल्हा न्यायालयात अपील करू शकतात. सुनावणीदरम्यान त्यांचे अर्ज वैध आढळल्यास ते निवडणूक लढवू शकतात. अन्यथा त्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत त्यांचे अर्ज मागे घेता येणार आहेत.